Mon, Apr 22, 2019 12:21होमपेज › Goa › मडकईकरांची प्रकृती गंभीर, मात्र स्थिर : आयुषमंत्री नाईक

मडकईकरांची प्रकृती गंभीर, मात्र स्थिर : आयुषमंत्री नाईक

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMपणजी : प्रतिनिधी

‘ब्रेन स्ट्रोक’मुळे शस्त्रक्रियेनंतर  वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावर अजूनही मुंबईतील कोकिळाबेन अंबानी इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीरच आहे. आपण सर्व गोमंतकीयांच्या वतीने ते लवकरात लवकर बरे होऊन राज्यात परतावेत, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करत असल्याचे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. 

मडकईकर अतिदक्षता विभागात असले तरी त्यांच्या प्रकृतीत  सुधारणा होत आहे, असे त्यांचे बंधू धाकू मडकईकर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर 72 तास त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते. पण   त्यानंतरही मडकईकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही.  ब्रेन स्ट्रोकमुळे मडकईकर यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या शरीराची उजवी बाजूही कमजोर झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर सोमवारी वैद्यकीय तपासणीच्या हेतूनेच मुंबईला गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेतून मडकईकर यांना फोन करून वीज पुरवठ्याविषयी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांच्याच सूचनेनुसार वीजमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलावली होती. मुंबईत ज्या हॉटेलमध्ये मडकईकर राहिले होते, तिथे त्यांची प्रकृती 
बिघडल्यामुळे त्यांना तातडीने  कोकिळाबेन इस्पितळात दाखल केले. तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. मंगळवारी (दि.5) सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीबाबत चौकशी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील काही मंत्र्यांशी संपर्क साधून पांडुरंग मडकईकर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. मडकईकर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी राज्यातून अनेक मंत्री, आमदारांनी कोकिळाबेन इस्पितळाला भेट दिली आहे. मडकईकर  अतिदक्षता विभागात असल्यामुळे त्यांची मुलगी डॉ. नताशा मडकईकर वगळता अन्य कोणाला आत सोडले जात नाही. पाच दिवसांनंतरही मडकईकर यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यामुळे सहकारी मंत्री, आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.