Fri, Jul 19, 2019 01:52होमपेज › Goa › पंचायत सदस्याला पोलिस स्थानकात मारहाण

पंचायत सदस्याला पोलिस स्थानकात मारहाण

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMमडगाव : प्रतिनिधी 

वाडे पंचायतीचे पंचायत सदस्य जानू झोरे यांना पोलिस स्थानकात झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे सांगे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर अडचणीत सापडले आहे. पोलिस निरीक्षकांनी  केलेल्या मारहाणीत झोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीप्रमाणे पंचायत सदस्य जानू झोरे यांचा भाऊ लक्ष्मण झोरे यांच्या विरोधात एका मुलीने आपली छळवणूक करत असल्याची तक्रार सांगे पोलिसांत केली होती. या तक्रारीवरून झोरे यांच्या विरोधात 151 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. शनिवारी या प्रकरणी झोरे याला चौकशी साठी पोलिस स्थानकात बोलाविण्यात आले होते. 

लक्ष्मण झोरे हा आपला भाऊ पंचायत सदस्य जानू झोरे व वकील प्रवेश मिसाळ यांना घेऊन पोलिस स्थानकात उपस्थित झाला. उपनिरीक्षक मनोज वेळीप हे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहेत. त्यांच्या समोर दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता.

जानू झोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर हे त्याठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांना आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले. चर्चा सुरू असताना एकोस्कर यांनी आपल्या आई आणि बहिणीविषयी अपशब्द वापरले. आपण त्यांना आई व बहिणीला अपशब्द  वापरू नका, अशी विनंती केली. त्यावर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, असा प्रश्‍न करत त्यांनी आपल्याला मारहाण करण्यास सुरू केले.

रात्री उशिरा जानू झोरे यांना सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रातून मडगावात हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आले. या घटनेमुळे धनगर समाजामध्ये तीव्र पडसात उमटले आहे. काले पंचायतीचे उपसरपंच बाबलो खरात यांनी एकोस्कर यांच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, धनगर समाजाला कमी लेखले जात आहे. अधिकारी जर असे वागू लागले तर न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्‍नही त्यांनी उपास्थित केला. मारहाणीचा हा  विषय अतिशय गंभीर असून धनगर समाज हा विषय पुढे नेणार आहे, असे खरात यांनी सांगितले. 

वकील मिसाळ यांनी  सांगितले, की कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. लक्ष्मण हा दोषी असेल तर पोलिसांनी त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची आवश्यकत होती. केपेचे उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी  सांगितले,की आपण सुट्टीवर असून सोमवारी या प्रकरणावीषयी माहिती घेऊनच काही सांगू शकतो.