Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Goa › व्ही. शांताराम अभिनेता, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

व्ही. शांताराम अभिनेता, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : अभिजीत रांजणे 

 राजा छत्रपती शाहू महाराजांच्या ‘कलापूर’ कोल्हापूरच्या मातीत अविरत कष्ट, सतत उद्योगात मग्न आणि चिकाटी असणारा कलाकार शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी झाला. व्ही. शांताराम यांनी चित्रपटातील देखावे वास्तववादी व्हावेत, कलाकारांची भूमिका माणसांच्या मनात ठासून भरणार्‍या अनेक चित्रपटांची निर्मिती करून काही चित्रपटांत अभिनय केला.

कोल्हापूरच्या मातीनं घडविलेला स्वयंप्रकाशी आणि स्वयंभू कलावंत म्हणजे व्ही. शांताराम. शांताराम हे शालेय जीवनात सामान्य असले तरी त्यांना नाट्य, संगीताची विलक्षण आवड होती. शांताराम स्नेहसंमेलनात उत्साहाने भाग घेत असतं. स्नेहसंमेलनात तोतयाचे बंड हे नाटक बसविले होते. त्यात त्यांचे थोरले भाऊ काशिनाथ, मावस बंधू बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी भूमिका केल्या होत्या. शांताराम नकला अतिशय छान करीत. शाळेतील शिक्षक त्यांना नकला करायला लावीत. हा वारसा त्यांना त्यांच्या  वडिलांकडून मिळाला होता.

शांताराम यांच्या नकला पाहून गोविंदराव टेंबे यांनी त्यांना नाटकात घालण्याचा निर्धार करून गंधर्व कंपनीत दाखल केलं. मानापमान नाटकात शांताराम यांनी स्त्रियांचा वेश घालून नृत्य केलं. गांधर्व कंपनीत असताना शांताराम यांचा नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी संबंध आला. त्यानंतर शांताराम यांचा संबंध महाराष्ट्र फि ल्म कंपनीच्या बाबुराव पेंटरांशी आला. बाबुराव पेंढारकर आणि बाबुराव पेंटर यांनी महाराष्ट्र फि ल्म कंपनीचा पत्रव्यवहार पाहण्याची जबाबदारी सोपवली. शांतारामांची सहीमधील ‘वणकुद्रे’ हे नाव इंग्रजीत वाचनात लोक कोणत्याही पद्धतीने उच्चार करतील, म्हणून त्यांनी  ‘वणकुद्रे’ अडनावाचे व्ही अक्षर घेऊन व्ही. शांताराम केले.  त्यांनतर सहीसाठी बदललेले व्ही. शांताराम हे नाव रसिकांनी चिरकाल स्मरणात ठेवले.

 बाबुराव पेंटर यांच्या सन 1924 मधील ‘कल्याण खजिना’ या चित्रपटातून व्ही. शांताराम यांची चित्रपटात करण्यास सुरूवात झाली. सन 1925 मध्ये महाराष्ट्र फि ल्म कंपनीने काढलेले राणा हमीर, शहाला शह, सावकारी पाश या तीन चित्रपटांत शांतारामा यांना संधी मिळाली. त्यानंतर  1 जून 1929 रोजी स्थापन झालेल्या प्रभात फि ल्म कंपनीच्या ‘गोपालकृष्ण’ या पहिल्या मूकचित्रपटात शांताराम यांना भूमिकेची संधी मिळाली. 14 डिसेंबर 1929 मध्ये मॅजेस्टिक सिनेमात गोपालकृष्ण प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

 भारत सरकाने बाल चित्रपट समितीची सन 1955 मध्ये स्थापना केली. या समितीचे अध्यक्षपद व्ही. शांतराम यांना स्वीकारण्यास सांगितले.  त्या वेळेस फु ल और कलियाँ, काले गोरे हे लघुपट बालकांसाठी तयार केले. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यानंतर ‘राजा-रानी को चाहे पसीना’  हा श्रमप्रतिष्ठेवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली.  या चित्रपटांत शांताराम यांचा नातू शारंगदेव याने वयाच्या तेराव्या वर्षी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.

शांताराम हे चित्रपटसृष्टीतील महान युगप्रवर्तक होते. माणूस, कुंकू, शेजारी, डॉ. कोटणीस की अमर कहानी, राम जोशी, अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे,   दो आँखे बारा हात, गीत गाया पत्थरोने, नवरंग, पिंजरा, शेजारी आदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आणि काही चित्रपटांत उत्तम अभिनय केल्या. भारतीय चित्रपटसृष्टीत अगदी आरंभापासून अविरत श्रमाच्या बळावर अयोध्येचा राजा ते गीत गाया पत्थरोने पर्यंतचा काळ व्ही. शांताराम यांनी गाजवला.