Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Goa › मांडवी, झुवारी पुलांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष कक्ष 

मांडवी, झुवारी पुलांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष कक्ष 

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 16 2017 12:27AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

नाताळ व नववर्ष काळात झुवारी व मांडवी पुलावर वाहन संख्या वाढल्यामुळे होणारी कोंडी दूर करून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष  वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी  विधानसभेत  शून्य तासावेळी दिली.  विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर  पर्यटकांची संख्या लक्षात घेता मांडवी व झुवारी पुलावरील वाहतुक व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शून्य तासावेळी  केली.

कवळेकर म्हणाले, गोव्यात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच नाताळ व नववर्ष काळात या संख्येत  आणखी वाढ  होणार आहे.  सध्या मांडवी व झुवारी नद्यांवरील   नव्या पुलांचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नाताळ व नववर्ष काळात या समस्येत अधिकच भर पडण्याची भीती असल्याने त्यावर तोडगा काढावा , असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, नाताळ व नववर्ष काळात मांडवी व झुवारीवरील वाहतूक  व्यवस्थापनाच्या जबाबदारीसाठी विशेष वाहतूक नियंत्रण कक्षाची स्थापना 23 डिसेंबर पासून केली जाणार आहे,  यापैकी एक पथक मांडवी तर दुसरे पथक झुवारी पुलावरील वाहतूक नियंत्रणाचे काम हाताळेल. याशिवाय नियमित गस्तदेखील सुरु असेल. त्याचबरोबर या दोन्ही पुलांकडे वाहतूक पोलिसांची प्रत्येकी एक क्रेनदेखील तैनात केली जाईल. पोलिस खात्याच्या ताफ्यात लवकरच 41 नवी वाहने दाखल होणार  आहेत, असेही त्यांनी सांगितले.