Fri, Nov 16, 2018 03:15होमपेज › Goa › संप सुरूच...

संप सुरूच...

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:37AMपणजी : प्रतिनिधी

स्पीड गव्हर्नर व डिजिटल मीटरविरोधात  राज्यातील टुरिस्ट टॅक्सी मालकांनी शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी बंद पाळला. सरकारकडून मात्र  लेखी आश्‍वासन देण्यात न आल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्धार टुरिस्ट टॅक्सी मालकांनी केला आहे. आझाद मैदानावर रविवारी (दि.21) सकाळी 9 वाजता पुन्हा सर्व टुरिस्ट टॅक्सी मालक एकत्र येणार आहेत.

संपाच्या पार्श्‍वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  संपकर्‍यांनी  कुठलाही अनुचित प्रकार  केल्यास त्यांच्यावर कारवाईची तयारी ठेवा, असे निर्देश पोलिस खात्याकडून कर्मचार्‍यांना देण्यात आले होते. पणजी येथील आझाद मैदानावर यावेळी तीन  हजारहून अधिक   टुरिस्ट टॅक्सी मालक जमले  होते. सलग दोन दिवस टुरिस्ट टॅक्सींचा संप सुरू राहिल्याने राज्यातील पर्यटकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. विशेष करून  हॉटेलला सेवा पुरवणार्‍या टॅक्सीदेखील संपात सहभागी झाल्याने या हॉटेलांमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

टॅक्सी मालकांच्या आंदोलनाला शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांबरोबरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विल्फ्रेड डिसा, दिगंबर कामत, माजी आमदार  कायतू सिल्वा, मिकी पाशेको, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, सावित्री कवळेकर, आयटकचे कामगार नेते अ‍ॅड. सुहास नाईक यांनी  आझाद मैदानावर जाऊन पाठिंंबा दर्शवला.