Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Goa › राज्यातील व्याघ्रगणना फेबु्रवारीमध्ये

राज्यातील व्याघ्रगणना फेबु्रवारीमध्ये

Published On: Jan 09 2018 2:12AM | Last Updated: Jan 09 2018 2:04AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

 राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणातर्फे देशातील 18 राज्यांमध्ये 2018 ची व्याघ्रगणना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गोव्यात येत्या फेब्रुवारी महिन्यापासून नव्याने व्याघ्रगणना होणार आहे. या सर्वेक्षणासाठी जंगलांमध्ये कॅमेर्‍यांचा वापर केला जणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.    गोव्याच्या जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व असल्याचा दावा काही पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. या दाव्याला या गणनेतून पुष्टी मिळणार की नाही याची उत्सुकता प्राणीप्रेमींनाही आहे.

 राज्यातील  जंगलात वाघांचे अस्तित्व आढळून आले असले तरी ते शेजारील राज्यातून स्थलांतर झाले आहेत की याच भागात वाघांचा राबता आहे, हेही या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे. गोव्याला कर्नाटक व महाराष्ट्र या शेजारी राज्यांची जंगल हद्द आहे. देशातील कोणत्याही जंगलात वाघांची संख्या 50 हून अधिक आढळल्यास संबंधित जंगलक्षेत्र हे वाघांचा अधिवास मानले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हादई अभयारण्यात राज्य वन खात्याने केलेल्या सर्वेक्षणात गोव्याच्या जंगलात एप्रिल 2017 मध्ये सहा वाघ आढळून आले होते. यात दोन नर, दोन मादी तर दोन बछडे आढळून आले होते. राज्यात 2002 साली प्रथम वाघांचे अस्तित्व दिसून आले होते.