Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Goa › दहा लाखांच्या चोरीचा 3 तासांत छडा

दहा लाखांच्या चोरीचा 3 तासांत छडा

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी

जुने गोवे-पणजी बगलमार्गा लगतच्या एका बंगल्यात चोरी करून लाखो रुपयांचा माल लांबवणार्‍या लक्ष्मण  होसमनी (वय 19, चिंबल) या संशयित चोरट्याला अटक करून जुने गोवे पोलिसांनी या चोरीचा अवघ्या तीन तासांत छडा  लावला. पोलिसांनी संशयित लक्ष्मणकडून सोन्याचे दागिने व अन्य साहित्य मिळून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. चोरीप्रकरणी  संशयिताची आई  शोभा हिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे.
जुने गोवे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. संशयित हे अन्य चोर्‍यांमध्ये देखील सहभागी आहेत का, याचाही तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.  प्राप्‍त माहितीनुसार जुने गोवे  पणजी  बगलमार्गालगत  साईबाबा मंदिरानजीक असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याचा फोन जुने गोवे पोलिसांना मंगळवारी पहाटे 4 वाजता आला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून सोन्याचे दागिने तसेच अन्य साहित्यावर हात मारला होता. नंतर पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे 

गतीने फिरवत अवघ्या तीन तासांत म्हणजे सकाळी 7 वाजता   संशयित लक्ष्मण याला त्याच्या चिंबल येथील घरातून अटक केली. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचा सर्व सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयिताने गुन्हा कबूल केला असून या चोरीत त्याला  साथ देणार्‍या त्याची आई  शोभा हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 

 जुने  गोवे पोलिस निरीक्षक आशिष  शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  महिला पोलिस उपनिरीक्षक प्रगती मळीक, उपनिरीक्षक अजय धुरी, पोलिस उपनिरीक्षक साहील वारंग, कॉन्स्टेबल शाणू राऊत, अनिकेत  तसेच  महिला  कॉन्स्टेबल  श्रीलिजा नाईक यांनी हा चोरीचा छडा लावण्यात महत्वाची कामगिरी बजावली.