Wed, Apr 01, 2020 01:24होमपेज › Goa › परराज्यातील रुग्णांना जानेवारीपासून शुल्क 

परराज्यातील रुग्णांना जानेवारीपासून शुल्क 

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:51AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील गोमेकॉसह चार सरकारी इस्पितळांमध्ये परराज्यातील रुग्णांकडून येत्या 1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. गरीब आणि आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या परराज्यातील रुग्णांना मोफत सेवा दिली जाईल. याशिवाय ‘दयानंद स्वास्थ्य विमा योजनें’तर्गत कार्डधारक असलेल्या गोमंतकीयांना मोफत उपचार मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत  दिली.

राणे म्हणाले, बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळासह म्हापसा, मडगाव येथील जिल्हा इस्पितळांत व फोंडा येथील सरकारी इस्पितळात 1 जानेवारीपासून परराज्यातील रुग्णांना सशुल्क वैद्यकीय सेवा दिली जाईल. गोव्याशेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कर्नाटकातील कारवार, कुमठा भागांतून वैद्यकीय उपचारांसाठी येणार्‍यांना आता पैसे मोजावे  लागतील.  गोवा सरकारच्या ‘दयानंद स्वास्थ्य विमा योजनें’तर्गत ‘क’ श्रेणी इस्पितळांत वैद्यकीय उपचारांसाठी जेवढे शुल्क आकारले जाते, त्याच्या 20 टक्के इतके नाममात्र शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. गरीब आणि आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्या वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या परप्रांतीयांना मोफत सेवा दिली जाईल. मात्र याबाबतचा निर्णय आरोग्य खात्याचे संचालक व गोमेकॉचे अधीक्षक घेतील.