Mon, Nov 19, 2018 21:05होमपेज › Goa › सरकारी प्राथमिक शाळांत लवकरच शिक्षक भरती

सरकारी प्राथमिक शाळांत लवकरच शिक्षक भरती

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:28AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये येत्या दोन महिन्यात 200 ते 250  शिक्षकांची लवकरच  भरती केली जाणार आहे,अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  सोमवारी  विधानसभेत शून्य तासावेळी  दिली.  डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी   डी.एड शिक्षकांची  सरकारी शाळांमध्ये भरती  करण्यासंदर्भात मागणी केली असता त्यांनी वरील माहिती दिली.  पाटणेकर म्हणाले, 2008 साला पासून सरकारी प्राथमिक शाळांमध्ये    शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही.  दरवर्षी डी.एड महाविद्यालयातून  जवळपास 250 शिक्षक उत्तीर्ण होतात. परंतु गेल्या अनेक वषार्ंपासून सरकारकडून त्यांची भरती करण्यात आलेली नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, यावर्षी जानेवारी  फेबु्रवारी  या दोन  महिन्यांच्या कालावधीत   सरकारकडून  200 ते 250 शिक्षकांची सरकारी प्राथमिक शाळांमध्ये भरती करण्याच्या प्रक्रियेस सुरवात केली जाणार आहे.  याशिवाय  खासगी शाळांमध्येदेखील जवळपास  100 शिक्षकांची भरती केली जाईल.  पुढील वर्षी सरकारकडून आणखी 200 हून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल. सेवेत कायम करण्याची मागणी करणार्‍या  पॅरा शिक्षकांचा विषय काहीसा वेगळा असून त्यांनाही सामावून घेतले जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.