Tue, Mar 19, 2019 15:58होमपेज › Goa › सरकारी इस्पितळात निकृष्ट औषधे आढळल्यास कारवाई 

सरकारी इस्पितळात निकृष्ट औषधे आढळल्यास कारवाई 

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:18AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोमेकॉ किंवा अन्य सरकारी इस्पितळांमध्ये जर हलक्या दर्जाची  औषधे उपलब्ध होत असतील तर  ती बाब  निदर्शनास आणून द्यावी. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी सोमवारी विधानसभेत  सांगितले. प्रश्‍नोत्तर तासावेळी  आमदार आंतोनिओ फर्नांडिस यांनी   विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले.  गोमेकॉ, हॉस्पिसिओ तसेच अन्य सरकारी इस्पितळांमध्ये औषधे  मोफत उपलब्ध केली जातात का, अशी विचारणा करून जी औषधे दिली जातात ती हलक्या दर्जाची असतात,असा आरोप आमदार फर्नांडिस यांनी केला होता.

 मंत्री राणे म्हणाले, सरकारी इस्पितळांमध्ये  हलक्या दर्जाची  औषधे उपलब्ध केली जात नाहीत.  औषध खरेदीसाठी योग्य ती निविदा प्रक्रिया पाळली जाते. तरी देखील जर हलक्या दर्जाची औषधे मिळत असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. सर्व  रुग्णांना औषधे  देण्याचा सरकारचा प्रयत्न केला. बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना गोमेकॉत व संबंधी सरकारी इस्पितळातील अंतर्गत फार्मसीमधून औषधे दिली जातात. इस्पितळात भरती असलेल्या रुग्णांना औषधे उपलब्ध केली जातात. औषधे कमी पडत असली तरच बाहेरुन औषधे खरेदी केली जातात.