होमपेज › Goa › स्पीड गव्हर्नर नसल्यास टॅक्सी ‘अनफिट’

स्पीड गव्हर्नर नसल्यास टॅक्सी ‘अनफिट’

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:40AMपणजी : प्रतिनिधी

कायद्यानुसार वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणे अनिवार्य आहे. त्यामुळे  कायद्याला बगल देऊन राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री  यातून सूट देऊ शकत नाहीत. 24 फेब्रुवारी नंतर स्पीड गव्हर्नर न बसवणारी वाहने रस्त्यावरून धावण्यासाठी ‘अनफिट’ ठरतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

केंद्र सरकारने 1 मे 2017 पासून वाहनांना  स्पीड गव्हर्नर  बसवणे सक्तीचे केले आहे. परंतु असे असूनदेखील  गोवा सरकारने टॅक्सी चालकांना   स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी सहा महिन्यांची सूट दिली. ही मुदत 24 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  राज्यातील टुरिस्ट टॅक्सी मालकांनी   मागील दोन दिवसांपासून संपाला  सुरुवात केली आहे. मात्र या संपाचे कारण कळवलेले नाही किंवा अधिकृत नोटीस सरकारला दिलेली नाही.  

18 जानेवारीला त्यांचे संपावर जाणार असल्याचे  निवेदन  प्राप्त झाले.  टॅक्सी मालक संघटनेकडून आपल्याला  त्यांच्या मागण्यांसंदर्भात कुठलेही  निवेदन देण्यात आलेले नाही. टॅक्सींना  स्पीड गव्हर्नर जबरदस्तीने लागू केले जात असल्याचा आरोप  संघटनेकडून केला जात आहे. स्पीड गव्हर्नर संदर्भातील कायदा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे पर्रीकर तो लादत असल्याचा त्यांचा आरोप चुकीचा व बिनबुडाचा आहे. 

स्पीड गव्हर्नर बसवणे कायद्याने सक्तीचे असून त्याची अंमलबजावणी देशभरात करण्यात येत आहे.  कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश अशा सर्वच राज्यांमध्ये ते लागू करण्यात आले असून कुठल्याही सरकारने सूट दिलेली नाही. जे सर्व राज्यांना लागू आहे, ते गोव्यालादेखील लागू होणार आहे. मुख्यमंत्रीदेखील यातून सूट देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. 

राज्यात सुमारे 17 हजार टॅक्सी असून त्यापैकी 4 हजार 500 टॅक्सींच्या मालकांनी स्पीड गव्हर्नर आपल्या वाहनांना बसवले आहे. टुरिस्ट टॅक्सींच्या संपाबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी  यासाठी पावले उचलली जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे शिष्टमंडळ टॅक्सी संपाविषयीच्या चर्चेसाठी रविवारी (दि.21) दुपारी 12 वाजता आपली भेट घेणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.