Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Goa › घनकचरा व्यवस्थापनात गोवा उत्तम

घनकचरा व्यवस्थापनात गोवा उत्तम

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:32AMपणजी : प्रतिनिधी

 घनकचरा व्यवस्थापनाच्या  क्षेत्रात गोवा  उत्तम कामगिरी करीत आहे. त्यामुळेच कचरामुक्त  शहरांच्या   स्टार मानांकनाचा  आरंभ गोव्यातून करण्यात आला आहे,असे  केंद्रीय  गृहनिर्माण व  शहरी   व्यवहार मंत्री  हरदीप  पुरी यांनी  सांगितले. गोवा  येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे हागणदारीमुक्त  होईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  कचरामुक्त  शहरांच्या स्टार रेटींग योजनेच्या आरंभावेळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वच्छ भारत  मिशन अंतर्गत  कचरा मुक्त  शहरांचे  स्टार रेटिग केले जाणार आहे. 

 मंत्री  पुरी म्हणाले,  घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे कचर्‍याचे वर्गीकरण, सार्वजनिक, व्यावसायिक तसेच   रहिवाशी परिसरात   स्वच्छता राखणे आदी स्वच्छतेबाबतच्या विविध निकषांच्या आधारे  हे  स्टार मानांकन केले जाणार आहे.  2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट असून  गोवा  त्यापूर्वीच म्हणजे ऑक्टोबर 2018 पर्यंत हागणदारी मुक्त  होईल, असा विश्‍वास आहे.  देशातील सध्या  2 हजार 216 शहरे  हागणदारी मुक्त बनली आहेत.    

परवडणार्‍या दरात घरे उपलब्ध करण्यातही गोव्याची कामगिरी अव्वल आहे.  अमृत मिशन योजने अंतर्गत देखील गोव्याची कामगिरी समाधानकारक आहे.स्मार्ट सिटी संदर्भात विविध  विकासकामांनाही गती देणे आवश्यक आहे. 2011 च्या जनगणेनुसार गोव्यातील फोंडा, मुरगाव व मडगाव या शहरांतील  झोपडपट्ट्यांमध्ये  4 हजार 846 घरे आहेत.  त्यामुळे  झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पांना गती देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी  सांगितले.

   मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा व अन्य अधिकारी उपस्थित होते.  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत   सामान्यांना परवडणार्‍या दरात घरे देण्याचे सरकारचे ध्येय आहे. गोव्यात या योजनेंंतर्गत 5 हजार घरांची मागणी आहे.  त्यापैकी 1 हजार घरांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत  गृह कर्जासाठी  1.28 कोटी रुपयांची सबसिडी  61 लाभार्थ्यांना मंजूर  करण्यात आली आहे,असेही केंद्रीय  गृहनिर्माण व  शहर  व्यवहार मंत्री  हरदीप  पुरी यांनी  सांगितले.