Fri, Jul 10, 2020 20:36होमपेज › Goa › सहा खाणींच्या परवाने नूतनीकरणाला मान्यता

सहा खाणींच्या परवाने नूतनीकरणाला मान्यता

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 12:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोडली, शिगाव, शिरगाव, वेळगे, सुर्ला, अडवण आदी ठिकाणी असलेल्या सहा खनिज खाणींच्या ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा  निर्णय  सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी  सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे अध्यक्ष गणेश शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची विशेष बैठक सोमवारी पार पडली. यावेळी उत्तर गोव्यात   सध्या  सुरू असलेल्या या सहाही खनिज खाणींचा विषय चर्चेस आला.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खनिज खाणी चालविण्यासाठी हवा व जल कायद्यांतर्गत ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना  घ्यावा लागतो. या सहा खाणींची मान्यता 31 डिसेंबर 2017 रोजी संपुष्टात आली. सदर परवान्यांचे नूतनीकरण करावे, यासाठी सहा खाणींच्या संबंधित कंपन्यांनी मंडळाकडे अर्ज केले होते. त्यानुसार खाण परवाने नूतनीकरण करावे असे बैठकीत ठरवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
या सहाही खाणींविषयीचे विविध अहवाल मंडळाने मागून घेतले होते. ते पाहिल्यानंतर मंडळाच्या बैठकीत या खनिज खाणींना  तत्त्वत: मान्यता द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. मंडळाने काही अटींसह ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सहा खाणींमध्ये बद्रुद्दीन मावानी (केवणा), पांडुरंग तिंबलो इंडस्ट्रीज (कोडली), व्ही. एम. साळगावकर अ‍ॅण्ड ब्रदर्स (वेळगे- सुर्ल), सेझा मायनिंग कॉर्पोरेशन, व्ही. एम. साळगावकर आणि वेदांता लिमिटेड  (कोडली) या कंपन्यांच्या खाणींचा समावेश आहे.