Sun, Jul 21, 2019 13:02होमपेज › Goa › पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक 

पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक 

Published On: Mar 10 2018 2:15AM | Last Updated: Mar 10 2018 2:09AMपणजी : प्रतिनिधी

पणजी शहरात   शनिवारी (दि.10)   शिमगोत्सव  मिरवणुकीनिमित्त  ‘ओस्सय ओस्सय, घुमचं कटर घुम’ चा नाद घुमणार आहे. यंदा प्रथमच   शिमगोत्सव मिरवणूक मिरामार-दोनापावला या मार्गावर होणार आहे.  या मिरवणुकीद्वारे गोव्यातील पारंपरिक  नृत्य, लोकनृत्य, घोडेमोडणी, गोफ, रोमटामेळ आदी संस्कृतिदर्शक कला प्रकारांबरोबरच पौराणिक कथांवर आधारित आकर्षक चित्ररथ पाहण्याची संधीही  स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांना लाभणार आहे.

शिमगोत्सवासाठी पणजीत सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली असून मंच उभारण्यात आला आहे. शिमगोत्सव मिरवणुकीला संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार असून  चित्ररथ घेऊन स्पर्धंकांना 3.30 वाजेपर्यंत मिरवणूक स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन पणजी शिमगोत्सव समितीतर्फे करण्यात  आले आहे. पणजी शिमगोत्सवातील  स्पर्धांसाठी एकूण 6 लाख 70 हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवली आहेत. पणजीतील काकुलो बेटापासून 18 जून मार्गावर दरवर्षी शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले जायचे.परंतु यंदा कार्निव्हलप्रमाणेच शिमगोत्सवदेखील मीरामार-दोनापावला या मार्गावर हलवण्यात आला आहे.

शिमगोत्सव मिरवणूक  मार्गातील बदलामुळे या मार्गावरील  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. शिमगोत्सव मिरवणुकीसाठी मिरामार ते विज्ञान केंद्र या मार्गावर  चित्ररथ ठेवले जातील. शिमगोत्सव मिरवणूक हार्डली डेव्हीडसन्स शोरूमपर्यंत काढण्यात येईल. या शिमगोत्सव  मिरवणुकीसाठी येणार्‍या लोकांसाठी बसस्थानक ते मीरामार पर्यंत दुपारी 2.30 पासून खास  कदंबा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.