Mon, Aug 19, 2019 18:46होमपेज › Goa › पणजीत १५ पासून सेरेंडिपिटी कला महोत्सव

पणजीत १५ पासून सेरेंडिपिटी कला महोत्सव

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:14PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

भारतातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविणारा दुसरा सेरेंडिपिटी कला महोत्सव दि. 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत पणजीत आयोजित करण्यात आला आहे. पणजीतील 10 ते 12 विविध ठिकाणांवर महोत्सवानिमित्त कलात्मक कार्यक्रम सादर होतील, अशी माहती सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हलच्या संचालक स्मृती राजगार्‍हिया यांनी बुधवारी आदिल शहा पॅलेसमध्ये पत्रकार परिषदेत दिली. 
स्मृती राजगार्‍हीया म्हणाल्या, कलेच्या विविध विषयांचे दर्शन घडवणार्‍या अनोख्या कला महोत्सवाला अवघा एक आठवडा उरला असून यंदा अनेक कलाकारांची मांदियाळी महोत्सवात सहभागी होणार आहे. यंदा महोत्सवात विविध कलाप्रकार, वैविध्यपूर्ण दृश्यकलांचे प्रकल्प आणि विख्यात कलावंतांची अनोखी रंगमंच सादरीकरण असा नजराणा आहे.  भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या सत्तराहून अधिक शैली व माध्यमांचे दर्शन या महोत्सवात घडणार आहे.

विवेक मेनेझिस म्हणाले, यंदा सेरेंडिपिटित ललित दुबे, रणजित बारोट, शुभा मुद्गल, प्रशांत पंजियार अशा अनेक प्रसिध्द कलावंतांनी आकारास आणलेले प्रकल्प महोत्सवात दाखवले जातील. भारतातील वैविध्यपूर्ण आणि बहुरंगी कलेच्या वारशाची पुनर्बांधणी हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कला महोत्सवाने राज्यात एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले आहे. जॉर्ज विरशिंग म्हणाले, महोत्सवात चित्रपटाशी निगडित 130 चित्रे प्रदर्शनास ठेवली जातील. पूर्वीच्या काळातील चित्रपट निर्मिती या प्रदर्शनातून लोकांना पाहायला मिळेल.  स्वायन चौधरी म्हणाले, संगीत, नृत्य, रंगभूमी, दृश्यकला आणि पाक कलेतील चमकदार कार्यक्रमांच्या रुपरेषेसह यंदाचा महोत्सव गोमंतकीयांच्या भेटीस येईल.

गोवा हे कलेचे स्थान असून महोत्सवात कलाशिक्षण, कलेला आश्रय, संस्कृती, दोन कला शाखांमधील संवाद व कलेपर्यंत पोहोचण्यातील सुलभता या विषयांवरही चर्चा होईल. यामधून कल्पनांचे आदानप्रदान करून अर्थपूर्ण पद्धतीने स्वत:ला गुंतवून घेण्याची प्रेरणा भारतातील युवावर्गाला मिळेल. यंदा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. कलाकार विवेक मेनेझिस, हिंदी चित्रपटांच्या इतिहासाचे अभ्यासक जॉर्ज विरशिंग, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक स्वायन चौधरी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.