Sun, Aug 25, 2019 08:49होमपेज › Goa › राज्यातील ड्रग्ज विक्री व्यवसाय उद्ध्वस्त करणार

राज्यातील ड्रग्ज विक्री व्यवसाय उद्ध्वस्त करणार

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:22AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

राज्यात वाढत्या ड्रग्ज प्रकरणाबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी सोमवारी विधानसभेत चिंता व्यक्त केली. यानंतर राज्यातील ड्रग्जची किरकोळ आणि घाऊक विक्री उद्ध्वस्त करणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सभागृहात दिले. आमदार प्रतापसिंह राणे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. विद्यालय व समुद्रकिनार्‍यांवर सीसीटीव्ही कॅमेराची आवश्यकता व ड्रग्जला बळी पडलेल्या लोकांचे काय करणार असा प्रश्‍न राणे यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केला होता.

यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले, की अमली पदार्थ विरोधी पथकातील  (एएनसी) चे मनुष्यबळ तिप्पट वाढविण्यात येणार आहे. ड्रग्जचा छडा लावणारे विशेष पथक नेमण्यात येईल. म्हापसा येथे ड्रग्ज प्रतिबंध केेंद्र्र सुरु करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात ते कार्यान्वित केले जाणार आहे. ए.एन.सी.पथकाने राज्यात सुमारे 70 जागा पडताळल्या आहेत. ज्या ठिकाणी ड्रग्ज पार्ट्या होतात. या ठिकाणांचा काळ्या यादीत  समावेश केला जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पार्ट्यांवर निर्बंध आणले जाणार आहेत.

या ठिकाणांमध्ये काही हॉटेलचांही समावेश आहे. विद्यालयांमध्ये सुरु केलेल्या समुपदेशनात सुधारणा केली जाणार आहे. महाविद्यालयांमध्येही समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थी ड्रग्जला बळी पडू नये याची खबरदारी घेण्याची शिक्षक, मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. 2018 हे वर्ष ड्रग्ज आणि अपघात मुक्त करण्यासाठी मंत्री आमदारांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली. आमदार नीलेश काब्राल यांनी ड्रग्जचे मूळे कुठे आहे ते शोधून काढावेत, अशी सूचना सभागृहात केली. मांद्रे किनारी भागात ड्रग्ज  पार्ट्या चालतात. पोलिसांना फोन केला तर प्रतिसाद मिळत नाही, असे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले. त्यावर आलेक्स रेजिनाल्ड यांनी अशा पोलिस धिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी केली. उपसभापती मायकल लोबो, आमदार राजेश पाटणेकर आणि आमदार लुईजिन फालेरो यांनीही ड्रग्ज ग्रामिण भागात आणि विद्यालयापर्यंत पोहोचल्याची खंत व्यक्त  केली.