Sun, Feb 23, 2020 16:48होमपेज › Goa › पणजी बुधवारपर्यंत खड्डेमुक्‍तचे लक्ष्य

पणजी बुधवारपर्यंत खड्डेमुक्‍तचे लक्ष्य

Published On: Aug 26 2019 1:46AM | Last Updated: Aug 26 2019 1:46AM
पणजी : प्रतिनिधी 

पणजी महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही जोरात सुरू आहे. रस्त्यांवर काही ठिकाणी पेव्हर्स बसवण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी काँक्रिट घालण्यात येत आहे. येत्या बुधवारपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. 
सांतइनेज येथील जंक्शनवर पेव्हर्स बसविण्याचे काम रविवारी सुरू होते. या जंक्शनवरील पेव्हर्सचे काम सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण होईल. पेव्हर्स बसविण्यासाठी तसेच काँक्रिटने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शहरातील काही ठिकाणे लोकांनीच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मनपाच्या निदर्शनास आणून दिली आहेत. त्यानुसार काम सुरू आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.

मडकईकर पुढे म्हणाले, मनपाकडून खड्डे बुजविण्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले होते. सध्या रस्त्यांच्या अन्य डागडुजीची कामेदेखील हाती घेण्यात आली असून रात्रीच्यावेळी वाहतूक कमी प्रमाणात असताना ही कामे करण्यावर भर दिला जात आहे. तसेच रविवारी अन्य दिवसांच्या तुलनेत कमी वर्दळ असल्याने पेव्हर्स बसविण्याचे कामही अधिक विलंब न करता सुरू करण्यात आले.
दरम्यान, पणजी शहराच्या रस्त्यांची स्थिती फार बिकट झाल्याने खड्ड्यांपासून लोकांचा बचाव करण्यासाठी मनपा महापौर मडकईकर यांनी आगळा-वेगळा व्हॉट्सअ‍ॅप उपक्रम हाती घेतला होता. 
उपक्रमाअंतर्गत लोकांना पणजीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढून आपल्याला पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार लोकांकडून पाठविण्यात आलेल्या फोटो व स्थळाच्या आधारे आरएमसीमार्फत अनेक ठिकाणांवरील खड्डे सिमेंट काँक्रीट घालून बुजविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी काम सुरू असल्याचेही दिसून येत आहे.