Tue, Mar 19, 2019 03:53होमपेज › Goa › ८ नद्यांचे पाणी प्रदूषित

८ नद्यांचे पाणी प्रदूषित

Published On: Jan 09 2018 2:12AM | Last Updated: Jan 09 2018 2:12AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

 राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी, अस्नोडा, डिचोली, शापोरा, वाळवंटी, साळ, खांडेपार व म्हापसा या आठ नद्यांमधील पाण्याच्या प्रदूषणाचा अभ्यास पूर्ण केला आहे. या नद्यांतील प्रदूषणाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी काठावरील घरेे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदींचे सांडपाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे प्रदूषण वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करण्याची शिफारस मंडळाने केली आहे. 
‘नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग’ कार्यक्रमाखाली गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ 49 ठिकाणी गोव्यातील नद्यांचा पाण्याच्या दर्जावर देखरेख ठेवत आहे. याशिवाय राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रमाखाली तीन ठिकाणी पाण्याचा दर्जा तपासला जातो. पाण्याचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.

त्यानुसार गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे. मंडळाने ही गोष्ट सरकारचे जलस्रोत खाते, आरोग्य खाते, काही ग्रामपंचायती व पालिकांच्या नजरेस आणून दिली आहे. प्रदूषित नद्यांच्या क्षेत्रात किंवा किनारी भागांत येणार्‍या गावांमध्ये विविध प्रकारची उपाययोजना करण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते व जलसंसाधन खात्याने मिळून स्थानिक प्रशासनाला केली आहे. राज्यातील सर्वच नद्या प्रदूषित झालेल्या नाहीत. मात्र, काही नद्या विशिष्ट भागांमध्ये प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे.  राज्यातील काही नद्यांच्या आधारे गोव्यातील पाणीपुरवठा व्यवस्था कार्यरत असून काही भागात पाणी प्रक्रिया प्रकल्प ही चालतात. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरी भागांना स्वतंत्र मलनिस्सारण व्यवस्था पुरवण्याची गरज आहे. म्हापसा, पर्वरी, फोंडा, न्हावेली  आदी भागातील मलनिस्सारणविषयक प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे मंडळाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.