Mon, Jul 22, 2019 01:24होमपेज › Goa › माध्यम समितीचे कार्य पूर्णत्वास; जानेवारीत अहवाल देणार

माध्यम समितीचे कार्य पूर्णत्वास; जानेवारीत अहवाल देणार

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:49AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यात प्राथमिक शिक्षण माध्यमावरील वाद मिटवण्यासाठी गोवा सरकारने नेमलेल्या अकरा जणांच्या तज्ज्ञांच्या समितीने आपले काम पूर्ण केले आहे. येत्या जानेवारी महिन्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. गोव्यात सध्या मराठी, कोकणी आणि   इंग्रजी अशा तीन माध्यमांतून प्राथमिक शिक्षण चालते. मराठी किंवा कोकणी  माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचे धोरण सरकारने निश्‍चित केले आहे. मात्र, गोव्यात सुमारे 135 इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना तत्कालीन काँग्रेस सरकारने व त्यानंतर भाजप सरकारने  अनुदान देणे सुरू ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने शिक्षण तज्ज्ञांची विशेष समिती नेमून सर्व घटकांना विश्‍वासात घेऊन अहवाल देण्यास समितीला सांगितले आहे. या समितीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे दोनवेळा समितीला मुदतवाढ देण्यात आली.

समितीने मागील आठ महिने  विविध तालुक्यांमध्ये जाऊन पालक, शिक्षणतज्ज्ञ,  मातृभाषाप्रेमी, शिक्षणप्रेमी व इंग्रजी भाषाप्रेमींच्याही बैठका घेऊन माध्यमप्रश्‍नी त्यांचे मत जाणून घेतले. डिसेंबर महिन्यात अहवालाचे  काम पूर्ण होईल व येत्या महिन्यात तो सादर केला जाईल, असे समितीच्या सदस्याने सांगितले. इंग्रजी प्राथमिक शाळांमध्ये हजारो मुले विद्यार्जन करत असल्याने त्यांनाही अनुदान मिळणे आवश्यक आहे, असे मत  काही पालकांनी समितीकडे मांडले आहे. अन्य काही पालकांनी व शिक्षण तज्ज्ञांनीही मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असा मुद्दा मांडून इंग्रजी शाळाना सरकारने अनुदान देऊ नये, अशी मागणी केली आहे.