Wed, Feb 26, 2020 10:48होमपेज › Goa › अत्याधुनिक नव्या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

अत्याधुनिक नव्या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:21PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अत्याधुनिक नव्या सहा सुसज्ज रुग्णवाहिकांचे लोकार्पण शनिवारी पर्वरी येथील सचिवालय प्रांगणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यातील रुग्णांना 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली.
पर्रीकर म्हणाले, राज्यात सध्या 33 ठिकाणी 108 रुग्णवाहिका आहेत. आता त्यांची संख्या 38 झाली आहे. जानेवारी महिन्यात पाच नव्या कार्डियाक रुग्णवाहिका सुरू केल्या जातील. या  ग्णवाहिकांमध्ये वेंटीलेटर व अन्य  अत्याधुनिक स्वरुपाची उपचार यंत्रणा आहे. शनिवारी लोकार्पण करण्यात आलेल्या एका रुग्णवाहिकेची किंमत 18 लाख रुपये असून कार्डियाक रुग्णवाहिकेची किंमत 28 लाख रुपये इतकी आहे. 

येत्या दोन  महिन्यांत आणखीन 10 रुग्णवाहिका आरोग्य खात्याच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली. ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने गोमेकॉत सुपरस्पेशलिटी विभाग सुरू केला जाणार असून याचे काम पुढील महिन्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. या शिवाय कर्करोग इस्पितळासाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, जुन्या 108 रुग्णवाहिका भंगारात काढल्या जाणार असून ज्या रुग्णवाहिका चांगल्या स्थितीत आहेत, त्यांची दुरुस्ती करून त्यांचा वापर इस्पितळात प्रसुती झालेल्या महिलांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी केला जाईल. 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे जानेवारी महिन्यात  लोकार्पण केले जाईल. देशात कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल, असे ते म्हणाले. लोकार्पण कार्यक्रमास आरोग्य खात्याचे अधिकारी व   108 रुग्णवाहिकेचा अधिकारी उपस्थित होते.