Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Goa › भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पणजीत निषेध

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पणजीत निषेध

Published On: Jan 05 2018 1:06AM | Last Updated: Jan 04 2018 10:58PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

दलितांवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. पुणे येथील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत असून या दंगलीस जबाबदार असलेल्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी  विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे गुरुवारी पणजीतील आंबेडकर उद्यानात आयोजित निषेध सभेत करण्यात आली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समिती, गोव्याचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र जाधव म्हणाले, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आयोजित सभेवेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसात्मक निदर्शन झाली. या सभेसाठी गोव्यातून तीन प्रवासी बसेस करून लोक गेले होते. सुदैवाने, सर्वजण या घटनेतून सुखरुप परतले. ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यांचा विश्‍वभूषण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती जाहीर निषेध करते. महाराष्ट्र सरकारने हा भ्याड हल्‍ला करणार्‍यांना त्वरीत अटक करावी. दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल. 

दलितांवर आजही अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. गोव्यात दलितांवर अत्याचार होत असल्याची प्रकरणे समोर आल्यास गोव्यातील दलित संघटना शांत बसणार नाहीत. भीमा कोरेगाव घटनेनंतर ज्या प्रकारे  महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, त्याचप्रकारे गोवा बंदचा देखील विचार  केला जाईल, असा इशारा हरिश्‍चंद्र जाधव यांनी दिला.

दादू मांद्रेकर म्हणाले, आपल्या नेत्यांना मानवंदना देण्यास कोणीही अडवू शकत नाही. प्रत्यक्षात  या प्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीका घेणे आवश्यक होते. मात्र, याबाबत त्यांनी काहीच विधान केलेले नाही. भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध असून हा हल्‍ला करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी.