Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › पोलिस खात्याच्या भरतीत १० टक्के आरक्षण

पोलिस खात्याच्या भरतीत १० टक्के आरक्षण

Published On: Dec 19 2017 1:57AM | Last Updated: Dec 19 2017 12:26AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

 पोलिस खात्यात गृहरक्षक पोलिस कॉन्स्टेबलपदाच्या भरतीसाठी 10 टक्के आरक्षण दिले जाईल. त्यानुसार येत्या दोन वर्षांत पोलिस खात्यात 200  गृहरक्षकांना संधी मिळेल, अशी माहिती  सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत शून्य तासावेळी दिली. गृहरक्षकांनी  शनिवार व रविवारी ड्युटी  बजावू नये,असे तोंडी आदेश पोलिस खात्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार ,अशी भीती विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी शून्य तासावेळी उपस्थित केली होती. त्यासंबंधी मुख्यमंत्री बोलत होते.  

कवळेकर म्हणाले, की पोलिस खात्याच्या या तोंडी आदेशामुळे मागील अनेक वर्षापासून रोजंदारीवर काम करणार्‍या गृहरक्षकांच्या कामाचे दिवस कमी होतील. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल. कामाचे दिवस कमी केल्यास त्यांना केवळ 20 दिवसांचा पगार मिळेल. यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.   मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, गृहरक्षकांना शनिवार व रविवारी ड्यूटी न बजावण्याचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत.  गृहरक्षकांची सेवा ही  स्वयंसेवा आहे. तो रोजगार नाही.  गृहरक्षकांना आठवड्यातून एक दिवस सुटी दिली जाते. त्यामुळे त्यांची सेवा ही महिन्यातून 26 दिवसच असेल.

त्यांच्या पगारात  जुलै महिन्यात वाढ करुन तो  प्रती दिन  632 रुपये करण्यात आला आहे. त्यानुसार  26 दिवसांप्रमाणे  त्यांना 16 हजार 432 रुपये पगार मिळेल. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही.1 हजार 317 गृहरक्षक सध्या सेवा बजावत आहेत.  पोलिस खात्यात गृहरक्षकांची पोलिस कॉन्स्टेबलपदाच्या भरतीत 10 टक्के आरक्षण दिले जाईल. 50 वर्षाखालील  गृहरक्षकांचा 
 याअंतर्गत संधी मिळेल. यासाठी  पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड केलेल्या गृहरक्षकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल .