Sun, May 26, 2019 12:43होमपेज › Goa › ‘न आवडणारे बोलण्याचा हक्‍क  हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’

‘न आवडणारे बोलण्याचा हक्‍क  हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 14 2018 2:51AMपणजी : प्रतिनिधी

भारतात ‘अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य’  या शब्दाची व्याख्या इतरांना जे आवडेल त्या विषयावर भाष्य करणे अशी झाली आहे. ज्या गोष्टीतून सामुदायिक भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याच गोष्टींवर प्रकाश टाकावा याला अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य समजले जात आहे. परंतु, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य असणे या शब्दाचा अर्थच मुळात समाजातील एखाद्या गटाला आवडणार नाही अशा काही बाबींवर बोलण्याचा हक्‍क असणे होय, असे मत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक  व  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार मकरंद  साठे  यांनी व्यक्‍त केले.

देश-विदेशातील विचारवंतांकडून बुद्धीला वैचारिक खाद्य मिळवून देणार्‍या 11 व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात  नाटककार  मकरंद   साठे ‘जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी ’ या विषयावर बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन   कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, सचिव दौलत हवालदार व अन्य  उपस्थित होते. 

मकरंद साठे यांनी राष्ट्रीयतेवर आधुनिक संदर्भासह विचार व्यक्त केले. कोणा एका धर्म, जातीविषयी न बोलता त्यांनी सामान्य माणसाचे राष्ट्रप्रेम कशाप्रकारे चार भिंतीत दाबण्याचा प्रयत्न केला जातो, यावर प्रकाश टाकला. साठे म्हणाले, की जागतिकीकरणाच्या काळात भारतीय संस्कृतीवर बोलायचे झाले तर  राष्ट्रीयत्वाची व्याख्या प्रत्येक धर्म व संस्कृतीप्रमाणे बदलते. माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या संस्कृतीतून दिसून येते. एखादी गोष्ट वाईट घडली तर त्यावर निदर्शने करावी, बँकेचा वापर पैसे ठेवण्यासाठी करावा या गोष्टी निरक्षर माणूसही करतो. माणसाच्या  संस्कृतीप्रमाणे त्याचे वागणे दिसून येते.

आज  काळ बदलला आहे असे आपण म्हणतो. परंतु आजही माणसाला त्याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवरून ओळखले जाते. भारतात माणसाने काय खायचे, कुठे रहायचे या गोष्टीदेखील त्याच्या संस्कृती व परंपरेवर ठरतात. काही संस्कृती व परंपरा आपल्यावर पूर्वजांकडून लादल्या गेल्या हे देखील खरे आहे. ज्यात तिहेरी तलाक सारख्या गोष्टींचा समावेश आहे. यातून सुटकेसाठी मुसलमान धर्मातील महिलांना बराच त्रास सहन करावा लागला, असे सांगून ते म्हणाले, की एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जातील या भीतीने आपल्याकडे सेंसॉर बोर्डचा वापर केला जातो. आज आपण संत तुकाराम, रहिम यांना विसरून बाबा रामरहिमची भाषा बोलत आहोत. एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे व एखादी गोष्ट माणसावर लादणे अशाप्रकारचे वातावरण आपल्या भोवती आहे. 

इंटरनेट व टीव्हीच्या जगात थिएटरच्या माध्यमातून संवाद कसा साधायचा हा प्रश्‍न आहे. तंत्रज्ञान बरेच पुढे जात असून एखाद्या संस्कृती किंवा राष्ट्रीयतेवर थिएटरच्या माध्यमातून  भाष्य करण्यासाठी थिएटर कलाकारांना कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी थिएटरची टीव्ही किंवा इंटरनेटशी तुलना करणे चुकीचे आहे. थिएटरचा एक वेगळाच ढंग असून तो समजावण्यासाठी थिएटर कलाकारांनी दोन पावले पुढे यावे अशा अपेक्षा बाळगणार्‍या प्रेक्षकवर्गाने दोन पावले पुढे येऊन ते समजून घेेणे महत्वाचे असल्याचे साठे यांनी सांगितले. 

व्याख्यानमालेत उपस्थितांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, देशाचा आतंकवादापासून  बचाव करण्यासाठी या विषयावरील निर्णय हे देशातील सैन्य दलाकडून नाही तर सरकारकडून घेतले जायला हवेत, असे मतही साठे यांनी व्यक्त केले.