Thu, Apr 25, 2019 11:48होमपेज › Goa › पॅरा शिक्षक आज कामावर रुजू

पॅरा शिक्षक आज कामावर रुजू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सरकारने शनिवार, दि. 25 नोव्हेंबरपर्यंत कामावर रुजू न झाल्यास  निलंबित करण्याच्या दिलेल्या इशार्‍यामुळे तसेच भाजपचे आमदार नीलेश काब्राल आणि अपक्ष आमदार प्रसाद गावकर  यांनी सेवेत सामावून घेण्याच्या दिलेल्या आश्‍वासनानंतर पर्वरी येथील विधानसभेसमोर सुरू असलेले आंदोलन पॅरा शिक्षकांनी स्थगित केले. सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार, 25  रोजी सर्व पॅरा शिक्षक कामावर रुजू होणार आहेत, असे आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या रूपाली देसाई यांनी सांगितले. 

गोवा सर्व शिक्षा अभियानांतर्गत पॅरा शिक्षिका काम करतात. आपल्याला सेवेत कायम करा तसेच दूरवर करण्यात आलेल्या आपल्या बदल्या रद्द करा, अशी पॅरा शिक्षिकांची मागणी आहे. पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले होतेे. पॅरा शिक्षिकांनी महामार्गही रोखण्याचा प्रयत्न गुरुवारी केला होता. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर काही पॅरा शिक्षिका आंदोलन सोडून सेवेत पुन्हा रुजू झाल्या आहेत, तर उर्वरितांचे आंदोलन सुरू होते. 

भाजपचे आमदार नीलेश काब्राल आणि अपक्ष आमदार प्रसाद गावकर  यांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्या पॅरा शिक्षकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. या दोन्ही आमदारांनी त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती दाखवून येत्या सहा महिन्यांत त्यांचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. हे प्रश्‍न जर सहा महिन्यांत सोडवले गेले नाही तर आपण स्वत: पॅरा शिक्षकांच्या आंदोलनात सामील होणार असल्याचे ठामपणे सांगितल्यावर आंदोलक शांत झाले. यानंतर सर्व आंदोलकांनी पर्वरी विधानसभेसमोरील गेटचा रस्ता खुला करून पणजीची वाट धरली. यावेळी आंदोलनकर्त्या महिला पॅरा शिक्षकांसोबत वाद व हमरीतुमरी होऊनही पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने हे आंदोलन चिघळले नसल्याचे सूत्रांनी 
सांगितले.