Sat, Mar 28, 2020 22:17होमपेज › Goa › एनजीटीची पर्यावरण मंत्रालयास नोटीस

एनजीटीची पर्यावरण मंत्रालयास नोटीस

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:47AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

तेरेखोल येथील ‘लिडिंग हॉटेल्स प्रा. लि.’च्या वादग्रस्त गोल्फ कोर्स प्रकल्पाला पर्यावरणीय परवाना (ईसी) दिल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला नोटीस पाठवली असून यासंबंधी लवादाने दि. 12 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. पेडणे तालुक्यातील तेरेखोल गावातील सुपीक आणि मुंडकार-कुळांच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदा गोल्फ कोर्स बांधला जात असल्याची तक्रार स्थानिक गावकर्‍यांनी लवादाकडे केली होती.

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने 11 ऑक्टोबर 2017 रोजी या गोल्फ कोर्सला ‘ईसी’ मान्यता दिली होती. याप्रकरणी आग्नेलो गुदिन्हो, अँथनी मेंडीस, जुझे गुदिन्हो आदी तेरेखोलचे गावकरी आणि कुळांनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. केंद्राच्या ‘ईसी’ मान्यतेला आव्हान देताना फिर्यादी पक्षाने संबंधित हॉटेलने केंद्राची दिशाभूल केल्याचा दावा केला. या जमिनीत शेती व्यवसाय सुरू असून त्यावर गोल्फ कोर्स उभारण्यास परवानगी देणे संयुक्तिक नसल्याचे लवादापुढे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीनेही गोल्फ कोर्स आल्यास पर्यावरणाला कशी बाधा येईल, यावर अभ्यास केला नसल्याचे गावकर्‍यांनी म्हटले आहे.