Sun, Jul 21, 2019 15:01
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › नद्यांचे राष्ट्रीयीकरण; आज विधानसभेत चर्चा    

नद्यांचे राष्ट्रीयीकरण; आज विधानसभेत चर्चा    

Published On: Dec 18 2017 2:30AM | Last Updated: Dec 18 2017 1:10AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी  सोमवारी (दि.18) सध्या राज्यात  गाजत असलेल्या नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर चर्चा होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर याविषयी सरकारची बाजू मांडणार आहेत. चार  दिवस अवधीच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी समारोप होणार आहे. राज्यातील सहा नद्यांच्या   राष्ट्रीयीकरणावरून गदारोळ माजला असून विरोधी काँग्रेस आणि स्वयंसेवी संघटनांनी केंद्र सरकारकडे  राज्यातील नद्यांच्या  राष्ट्रीयीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

याविषयी गेल्या आठवड्यात सरकारतर्फे झालेल्या सादरीकरणाच्यावेळीही अनेकांनी प्रश्‍नांचा भडीमार केला होता. त्यामुळे आता राज्य  सरकारच्यावतीने भाजप आमदार राजेश पाटणेकर, ग्लेन टिकलो, प्रवीण झांट्ये, निलेश काब्राल आणि एलिना साल्ढाना यांनी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी या विषयावर सदस्यांना चर्चा करण्याची संधी दिली जाणार असून मुख्यमंत्री पर्रीकर विरोधकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत, असे सांगितले. 

याशिवाय, सोमवारी मुख्यमंत्री पर्रीकर, महसूलमंत्री रोहन खंवटे आणि कृषिमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडून मांडण्यात आलेल्या चार विधेयकांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत चार दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचा गोषवारा मांडणार असून त्यानंतर अधिवेशनाचा समारोप होणार आहे.