Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Goa › मिरामार येथे आजपासून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

मिरामार येथे आजपासून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 2:02AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

परिवर्तन परिवार बेळगाव व गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने मिरामार समुद्रकिनार्‍यावर दि.16 व 17   जानेवारी रोजी चौथ्या गोवा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात 10 वेगवेगळ्या  देशांमधून 22   तसेच भारतातील   पाच राज्यांतून 17  पतंगपटू   सहभागी होणार आहेत,अशी माहिती महोत्सवाचे समन्वयक अशोक नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवात 16 रोजी संध्याकाळी 6 ते 8 च्या दरम्यान ‘नाईट काइट फ्लाईंग’ ही आयोजित करण्यात आले आहे,असेही ते म्हणाले. अशोक नाईक  म्हणाले, की गेल्या तीन  वर्षांपासून हा महोत्सव गोव्यात आयोजित केला जात आहे. हा महोत्सव केवळ पतंग उडविण्यातला आनंद व त्याचा बाज सांभाळून कसरत करणार्‍या खेळाडूंमधला जोश व उत्साह अनुभवण्यासाठी आयोजित केला आहे. 

 महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार असून 17 रोजी संध्याकाळी 6 वाजता समारोप सोहळ्याला आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई व संचालक मिनीनो डिसोझा उपस्थित राहणार आहेत.  पतंग महोत्सवात इंद्रधनुषी रंगाचे अतिशय दुर्मीळ प्रकारचे पतंग, अतिशय लहान  पतंग   तसेच मोठमोठे पतंग आकाशात उडताना पहायला मिळणार आहेत. यात विविध ‘स्टंट’ पतंगांचाही समावेश असून पतंगांची रंगत लोकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे,असेही त्यांनी सांगितले. 
महोत्सवात अमेरिका, ब्रिटन, इटली,  ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स,  न्यूझिलँड, कॅनडा, इस्टोनिया, टर्की व स्वित्झर्लंड अशा दहा देशांतून 22 तर देशातील  कर्नाटक, केरळ, गुजरात , महाराष्ट्र व आंध्रप्रदेश  या राज्यांतून पतंगपटूंनी महोत्सवासाठी नोंदणी केली आहे. पत्रकार परिषदेत सतीश  कुलकर्णी व दीपक गोजगेकर उपस्थित होते.