Thu, Nov 22, 2018 16:17होमपेज › Goa › खाण लिलावास काँग्रेसचा विरोधच

खाण लिलावास काँग्रेसचा विरोधच

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:09AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणींचा लिलाव करण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. खाणींचा लिलाव केल्यास बाहेरील कंपन्या गोव्यातील खनिज मालाची लूट करतील जी गोव्याच्या हिताला बाधक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले. पर्रीकर सरकारने खाण प्रश्‍न योग्यप्रकारे न हाताळल्याने सरकारी तिजोरीला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी भाजपने सर्वपक्षीय व खाण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची बैठक बोलावून रोडमॅप तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

खाणींना नव्याने लिज जारी करणे व लिजांचे नूतनीकरण करणे या दोन्ही विषयांत सरकारने इतका गोंधळ घातला की, सर्वोच्च न्यायालयदेखील गोंधळात पडले आहे. खाण लिजांचा लिलाव करणे हे गोव्याच्या हिताचे नाही. तसे केल्यास बाहेरील कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करून खनिज मालाची लूट करतील, असे नाईक म्हणाले. बाहेरील कंपन्यांच्या तुलनेत निदान स्थानिक खाण व्यावसायिक राज्याच्या पर्यावरणाचा तरी विचार करतील. त्यामुळे सरकारने गोव्याच्या खाण कंपन्यांकडून  बाहेरील कंपन्यांना लिज ट्रान्स्फर करण्यावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली.