Wed, Mar 20, 2019 02:46होमपेज › Goa › कामत यांचा माझ्या खाणीशी संबंध नाही : डॉ. हेदे

कामत यांचा माझ्या खाणीशी संबंध नाही : डॉ. हेदे

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:43PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आपल्या खाणीच्या लिजच्या ‘कंडोनेशन डिले’बाबत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा कोणताही संबंध नाही. केंद्र सरकारने 1992-93 साली आपल्या खाणीला  ‘कंडोनेशन डिले’ अंतर्गत उत्खननाला परवानगी दिली असून त्याकाळी गोवा सरकारला ‘कंडोनेशन डिले’चा अधिकारच नव्हता. यामुळे 2007 सालापासूनच्या खाण घोटाळा प्रकरणी   आपण निर्दोष आहोत, असा  दावा खाण मालक डॉ. प्रफुल्ल हेदे यांनी बुधवारी केला.

येथे एका हॉटेलात  पत्रकार परिषदेत डॉ. हेदे व उपसरव्यवस्थापक शैलेश भरणे यांनी कागदोपत्री  पुराव्यांसह माहिती दिली. डॉ.  हेदे म्हणाले, की आपला 1987 सालापासून खाण व्यवसाय आहे.  कुळे येथील एका खाणीसंदर्भात 1992 साली गोवा सरकारने परवाना देण्यास अडवणूक केली असता केंद्रीय खाण मंत्रालयाचे संयुक्त सचिव एम. एल. मजुमदार यांच्याकडून ‘कंडोनेशन डिले’ अंतर्गत आपल्या बाजूने निर्णय झाला होता. यात मंत्रालयाने 1993 साली  या खाणीला राज्य सरकारने उत्खनन परवानगी  देण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाला मान देऊन तत्कालीन राज्य सरकारने आपल्या खाण लिज परवान्याचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर 2006 सालापर्यंत सर्व काही ठीकठाक चालले होते. मात्र एसआयटीने 2007 सालानंतर खाणीच्या घोटाळ्याच्या तपासात आपले नाव नाहक गुंतवले असून चुकीच्या माहितीखाली आपली चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत एसआयटीला आपण पूर्ण सहकार्य करत असून आवश्यक ती सर्व कागदोपत्रे  व परवाने दाखवले आहेत. या पुराव्याबाबत एसआयटीच्या तपास अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांचा तपास येत्या दोन महिन्यांत  पूर्ण न झाल्यास आपल्याला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे डॉ. हेदे यांनी सांगितले.