Tue, Jul 23, 2019 04:40होमपेज › Goa ›  राज्यात गोसुमं तर्फे २४ पासून म्हादई संपदा रक्षा यात्रा

 राज्यात गोसुमं तर्फे २४ पासून म्हादई संपदा रक्षा यात्रा

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

 म्हादई नदी ही गोव्याची जीवनदायिनी असून    तिच्या रक्षणासाठी    गोवा सुरक्षा मंचतर्फे 24 ते 30 जानेवारी दरम्यान,    म्हादई संपदा रक्षा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली. म्हादईप्रश्‍नी  कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस येडियुरप्पा  यांना पत्र पाठवणार्‍या  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,  अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  शिरोडकर म्हणाले,  गोवा व कर्नाटक या दोन्ही राज्यात म्हादईच्या पाणी वाटपावरून  वाद सुरु असून  गोव्याकडून  यासाठी म्हादई जलतंटा लवादासमोर लढा सुरू आहे.  कर्नाटकला म्हादईचे पाणी देणार नाही, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हादई प्रश्‍नावर यू टर्न घेतला आहे.

 कर्नाटक येथील  निवडणुकीत भाजपला लाभ मिळवून   देण्यासाठीच पर्रीकर यांनी येडियुरप्पा यांना पत्र पाठवले आहे. कर्नाटक सरकारकडून म्हादईचे पाणी  वळवण्यासाठी  कळसा भांडूरा हा प्रकल्प उभारला जात आहे. तसे झाल्यास  म्हादईचे खोरे  कोरडे पडण्याचा धोका आहे. याशिवाय गोव्यातील दाबोस, ओपा, गांजे  व अन्य जलशुध्दीकरण प्रकल्पांवरही त्याचा परिणाम होईल. या पार्श्‍वभूमीवर गोवा सुरक्षा मंचतर्फे  म्हादई संपदा रक्षा यात्रा आयोजित करण्यात  आली आहे.

त्यानुसार 24 रोजी  बाराजण, सुर्ला, केरी व साखळी येथे ही यात्रा होईल. 25 रोजी वाळपई, नगरगांव, बांबर, साटरें, 26 रोजी धावें, सावर्डे, शिरीन, वेळगे, खडकी, खोतोडे व गुळेली,27 रोजी गांजे, उसगाव, खोडेपार, वाघुर्मे, वेरे,28 रोजी वळवई, सावईवेरे, बेतकी, खांडोळे, माशेल, कुंभारजुवा, 29 जुने गोवे, दिवाडी, नार्वे व हातुर्ली, 30  रोजी चोडण,  रायबंदर व पणजी येथे ही यात्रा होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी मंचचे नेते  गोविंद देव, आत्माराम गावकर, नितीन फळदेसाई, गणेश गावकर, किरण नाईक उपस्थित होते.