Fri, Jul 10, 2020 22:44होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी सर्वच राजकीय पक्षांनी धोरण जाहीर करावे

म्हादईप्रश्‍नी सर्वच राजकीय पक्षांनी धोरण जाहीर करावे

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 12:28AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला दिल्यास गोवा संकटात सापडेल.त्यामुळे  राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी म्हादईप्रश्‍नी आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी ‘आमी गोंयकार’ संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. शशिकांत जोशी यांनी  पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. कर्नाटकाला पिण्याचे पाणी देण्यासंदर्भात कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना पाठवलेले पत्र मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  त्वरित मागे घ्यावे, असेही ते म्हणाले. 

म्हादई वाचवा ही मोहीम ‘आमी गोंयकार’ संघटनेतर्फे सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून   आंदोलनाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी 6 जानेवारीपासून राज्यभरात बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही  त्यांनी सांगितले.  ते म्हणाले, म्हादईप्रश्‍नी पर्रीकर यांनी येडियुरप्पा यांना पाठवलेले पत्र म्हणजे त्यांनीच 2012  साली घेतलेल्या त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहे. म्हादईचे पाणी दिल्यास गोवा संकटात सापडेल, त्यामुळे पर्रीकर यांनी  येडियुरप्पा यांना  पाठवलेले पत्र त्वरित मागे घ्यावे.

गोव्यातील राजकीय पक्षांनी   म्हादईविषयी आपले धोरण जाहीर करण्याबरोबरच  सर्व 40 आमदारांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी. आरटीआय कार्यकर्ते  राजन घाटे, अ‍ॅड. अजितसिंह राणे, स्वाती केरकर, डॉ. दत्ताराम  देसाई आणि अन्य यावेळी उपस्थित होते.