Fri, May 24, 2019 02:59होमपेज › Goa › पक्षी महोत्सवात ‘सागरी पक्ष्यां’चे निरीक्षण 

पक्षी महोत्सवात ‘सागरी पक्ष्यां’चे निरीक्षण 

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 11:00PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

वन खात्यातर्फे यंदा दुसर्‍यांदा पक्षी महोत्सवाचे खोतीगाव अभयारण्यात दि. 12 ते 14 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सागरी पक्ष्यांचे निरीक्षण हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती प्रधान वनसंरक्षक अजय सक्सेना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अजय सक्सेना म्हणाले, महोत्सवात सहभागी होण्यासाठी अमेरिका व श्रीलंकेतील प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. महोत्सवात सहभागी प्रतिनिधींची संख्या 200 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशातील एकूण पक्ष्यांच्या बाराशे प्रजातींपैकी गोव्यात 440 प्रजाती आढळतात.  

पक्षीप्रेमींना विविध पक्ष्यांची माहिती मिळावी, या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच सागरी पक्ष्यांचाही या महोत्सवात समावेश असेल. महोत्सवात सागरी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी प्रतिनिधींना  गालजीबाग व तेथून 10 किलोमीटर पुढे नेले जाईल. पक्षी निरीक्षणास सकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल. यात  नेत्रावळी अभयारण्याचा देखील समावेश असेल. महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना साडेतीन हजार रुपये आणि बोट ट्रीपची सुविधा हवी असल्यास  साडेचार  हजार रुपये शुल्क भरावे लागेल. वन खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन ही नोंदणी केली जाऊ शकते. प्रतिनिधींना रात्रीच्यावेळी राहण्यासाठी खोतीगाव अभयारण्य परिसरात तंबूमध्ये व्यवस्था केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

तीन दिवसीय महोत्सवात पक्षी तज्ज्ञ  डॉ.विभू प्रकाश हे  गिधाडांचे संवर्धन  या विषयावर  मार्गदर्शन करतील. डॉ. प्रताप सिंग,  शरद आपटे, डॉ. सतिश पांडे, शिवशंकर, रोहन चक्रवर्ती व कार्तिकायन  हे पक्ष्यांशी संबंधीत तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. महोत्सवानिमित छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी आतापर्यंत  65 जणांचे अर्ज आले  आहेत. गोवा पर्यटन, आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही  त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस वन खात्याचे अधिकारी संजय वराडकर उपस्थित होते.