Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Goa › मांडवी’ प्रदूषणमुक्‍तीसाठी ८०० कोटींचे प्रकल्प उभारणार

मांडवी’ प्रदूषणमुक्‍तीसाठी ८०० कोटींचे प्रकल्प उभारणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मांडवी नदी प्रदूषणमुक्‍त आणि स्वच्छ करण्यासाठी पणजीसह मांडवी किनार्‍यालगतच्या गावांमध्ये  मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. मलनिस्सारण महामंडळाने 711 कोटी 75 लाख रुपये खर्चाचे, सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे 8 कोटी 72 लाख रुपये, पंचायत खाते तसेच महापालिकेने 88 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव सरकारपुढे ठेवले आहेत. येत्या सप्टेंबर 2018 पर्यंत 808 कोटी 47 लाख रुपये खर्चाचे मलनिस्सारण प्रकल्प  उभे  केले जाणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) केलेल्या संशोधनात मांडवी नदी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. एनआयओने सादर केलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय हरित लवादाने  गेल्या 21 जुलै रोजी सरकारला मांडवी नदीच्या स्वच्छतेसाठी नियोजित व आखीव कार्यक्रम तयार करण्याचा आदेश दिला होता. एनआयओच्या अभ्यासात या नदीतील पाण्यात ‘फिकल कॉलिफॉर्म’चे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक झाल्याचे आढळले. आरोग्य संचालनालयानेही केलेल्या पाहणीत मांडवीच्या प्रदूषणाला पुष्टी मिळाली. 

मांडवी नदीच्या किनार्‍यावरील जहाज निर्मिती तथा दुरुस्तीच्या शिपयार्डमधील तसेच असंख्य घरांतील सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. पणजी शहरातील नदीपात्रात नांगरून ठेवलेल्या सुमारे  पाच  कॅसिनो जहाजे तसेच डझनभर जलसफरी करणार्‍या बोटींमुळे प्रदूषण होत आहे. मांडवीच्या दुसर्‍या बाजूच्या किनार्‍यावरील बेती, रेइश मागुश, बिठ्ठोण, नेरूल तसेच कांदोळी आदी उत्तरेकडील भागात  प्रदूषणात वाढ झाली आहे. या नदीकिनारी  दाट लोकवस्ती आहे. तेथील घरांना सोकपिट बांधणे शक्य नसल्याने मळी थेट मांडवी नदीत सोडण्यात येते. जुने गोवे, दिवाडी बेट, खोर्ली, करमळी आदी दक्षिणेकडील भागातील घरे, शिपयार्ड, व्यावसायिक आस्थापनांमधून सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याचे आढळून आले असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालात नमूद आहे