Mon, Apr 22, 2019 04:02होमपेज › Goa › एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा

एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍यांचे साहित्य जप्त करा

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

एलईडीव्दारे मासेमारी  करताना आढळल्यास  संबंधित मच्छीमाराचे  साहित्य जप्त करावे, असे आदेश  मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर यांनी मंगळवारी मत्स्योद्योग  खात्याला दिले. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करून त्या संबंधीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असेही मंत्री पालयेकर यांनी आदेशात  म्हटले आहे. यासंबंधीची माहिती मंत्री पालयेकर यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.  केंद्र सरकारकडून एलईडीव्दारे केल्या जाणार्‍या मासेमारीवर  मागील महिन्यात देशव्यापी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर वरील आदेश देण्यात आला आहे. 

एलईडी मासेमारीवर बंदी घालण्यात आल्याने एलईडीव्दारे मासेमारी करताना कोणी आढळून आल्यास   संबंधितांवर कडक कारवाई करावी. एलईडीव्दारे होणार्‍या   मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारी व्यवसायाला फटका बसत असल्याने त्यावर बंदी घातली जावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली होती.  सरकारचे या मागणीकडे  लक्ष वेधण्यासाठी  गेल्या वर्षी पारंपरिक मच्छीमारांनी पणजीत आंदोलनही   केले होते.  मंत्री पालयेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे की, राज्यात एलईडी मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने  मत्स्योद्योग खात्याला विशेष पथकांची  नियुक्ती करण्यास सांगितले आहे.

याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसून खात्याकडून यासंबंधी नियमितपणे माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, मंत्री पालयेकर यांनी दिलेल्या आदेशाचे पारंपरिक मच्छीमारांकडून स्वागत करण्यात आले आहे.