होमपेज › Goa › कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये नव्याने सुधारणा

कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये नव्याने सुधारणा

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:38AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सुमारे 11 योजना असून या योजनांमध्ये सध्या नव्याने सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या संंदर्भात,  मंडळाच्या कृती समितीची बैठक दि. 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहितीमंडळाचे अधिकारी पाशेको फर्नांडिस यांनी शनिवारी दिली.  पाशेको फर्नांडिस म्हणाले, बांधकाम कामगारांच्या योजना पुनर्जीवित करण्यासाठी,  कामगार योजनांमध्ये सुधारणा करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा सदस्यीय कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीत तीन बांधकाम कामगार, तीन काम देणार्‍या कंत्राटदारांचा समावेश आहे. 

बांधकाम कामगारांच्या योजना पुनर्जीवित करण्याची ही प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरू होती. सध्या ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या बैठकीत नवीन  योजना व त्यांच्या अंमलबजावणीविषयी चर्चा होईल. या योजनांमध्ये बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, काम करताना अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य, कामगारांना कर्ज, उपचारासाठी मदत, लग्नासाठी अर्थसाहाय्य, अंत्यसंस्कारासाठी मदत, कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मदत अशा सुमारे 11 योजना केंद्र सरकारच्या असून त्या राज्य सरकार राबवत आहे. कामगार कल्याण मंडळ, बांधकाम विभागाची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत मंडळाकडे 130 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. सुमारे साडेतीन हजार बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंद आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.