Thu, Jun 27, 2019 14:07होमपेज › Goa › कर्नाटकच्या आगळिकीचे पुरावे लवादाला 

कर्नाटकच्या आगळिकीचे पुरावे लवादाला 

Published On: Jan 16 2018 2:29AM | Last Updated: Jan 16 2018 2:27AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयास कळसा-भांडुराचे काम बंद करण्याची दिलेली हमी आणि जलतंटा लवादाने दिलेले आदेश यांचे उल्लंघन केल्याचे पुरावे गोव्याच्या कायदा पथकाने सोमवारी दिल्लीत म्हादई जलतंटा लवादासमोर सादर केले. एकूण तीन खंडात आणि सुमारे 531 पानांचा लेखी युक्तिवाद गोव्यातर्फे  मांडण्यात आला. गोव्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड.आत्माराम नाडकर्णी यांनी दिली. 

लवादासमोर सुरू असलेल्या मागील सुनावणीनंतरच्या घडामोडी तसेच कणकुंबी येथे कर्नाटककडून नव्याने केलेल्या बांधकामाची माहिती गोव्याकडून लवादासमोर मांडण्यात आली. अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या कायदा पथकाच्या सदस्यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत लेखी युक्तिवाद तयार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हादई जलतंटा लवादासमोर  गोव्याने मांडलेल्या लेखी युक्तिवादासंबंधी  नाडकर्णी म्हणाले, की राज्यातर्फे  एकूण तीन खंडात ‘समरी ऑफ आर्ग्युमेंट्स’ सादर करण्यात आला. हे तिन्ही खंड लवादासमोर सुरू असलेल्या सुनावणीतील विविध विषयांवर आधारित मुद्द्यांनिशी तयार करण्यात आले आहेत.

पहिल्या खंडात खटल्याची पार्श्‍वभूमी आणि त्यासंबंधी गोव्याची बाजू यासह जलविज्ञान विषयातील तज्ज्ञ साक्षीदारांचे म्हणणे देण्यात आले आहे. दुसर्‍या खंडात, पर्यावरण हानीबाबतीत गोव्याने सादर केलेले युक्तिवाद व कायद्यांची माहिती देण्यात आली असून जलप्राणिमात्र, जलपर्यावरण आणि जल प्रवाहासंबंधी म्हादईची नैसर्गिक स्थिती व त्यावर झालेल्या विपरीत परिणामाची माहिती नमूद करण्यात आली आहे.   तिसर्‍या खंडात सध्या सुरू असलेल्या कर्नाटक व गोवा राज्यांतील जलतंट्याशी निगडित कायदेशीर बाबी, कर्नाटकाने केलेले विविध तरतुदींचे  उल्लंघन, नदीच्या पाण्याबद्दल आंतरराष्ट्रीय कायद्यातील कलमे आणि कायदेशीर बाजू आदींचा तपशील देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.