होमपेज › Goa › कामत यांची कसून चौकशी

कामत यांची कसून चौकशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

खाण घोटाळा प्रकरणात शुक्रवारी  माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची विशेष तपास पथकाने शुक्रवारी सुमारे दोन तास चौकशी केली. कामत यांनी 2007 ते 2012 या कालावधीत मुख्यमंत्रिपदी असताना खनिज खाणींना ‘कंडोनेशन ऑफ डीले’ चा लाभ देऊन विविध सरकारी फायलींवर मारलेल्या शेर्‍यांबाबत सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कामत विशेष चौकशी  पथकासमोर अखेर शुक्रवारी हजर झाले. चार दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन ते एसआयटीसमोरच आले नव्हतेे. त्यानंतर एसआयटीने कामत यांचा मुलगा योगीराज आणि मेहुणे सतीश लवंदे यांचीही जबानी घेतली होती. त्यांची चौकशी झाल्यानंतर कामत आपल्या स्वीय सचिव आणि वकिलांसह  शुक्रवारी हजर झाले.
सदर चौकशीत नेमके काय मिळाले याचा तपशील दिल्यास तपासात अडथळा होण्याची शक्यता आहे. मात्र काही सरकारी फायलींबाबत कामत यांच्याकडून खुलासा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांची चौकशी अजूनही अपुरी असून गरज पडल्यास पुन्हा त्यांना बोलावले जाणार असल्याचे एसआयटीचे पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी पत्रकारांना सांगितले. 

सूत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार, 2007 ते 2012 या काळात मुख्यमंत्री तथा माजी खाण मंत्री कामत यांनी अनेक खाणींचे नूतनीकरण करताना फायलीवर मारलेल्या शेर्‍यांबाबत एसआयटीने कामत यांच्याकडे खुलासा मागितला. या खाणींच्या परवान्यांची मुदत संपुष्टात येऊनही त्यांना ‘कंडोनेशन ऑफ डीले’ च्या नियमांचा लाभ देऊन खाणींचे नूतनीकरण देण्याचा आदेश कामत यांनी दिला होता.