Sun, Jul 21, 2019 06:25होमपेज › Goa › पुरावे लवादाला सादर करणार : जलस्रोतमंत्री

पुरावे लवादाला सादर करणार : जलस्रोतमंत्री

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:18PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

जलतंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन करून कर्नाटकाने कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केले आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी घटनास्थळी पाहणी करून घटनेला दुजोरा दिला असून हे पुरावे कर्नाटक सरकारकडे पाठवले जाणार आहेत. म्हादई जलतंटा लवादापुढे येत्या 15 जानेवारी रोजी होणार्‍या सुनावणीवेळी पुरावे सादर केले जाणार आहेत, असे जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले. 
या प्रकरणी मंत्री पालयेकरांनी तातडीची बैठक बोलावून खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांना सदर घटनास्थळी पथक पाठवून   अहवाल देण्याचा आदेश दिला.  

या प्रकरणी पालयेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, लवादाच्या आदेशाचा अवमान झाला असून तसे पुरावेही मिळाले असल्याचे सांगितले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी आपण खात्याच्या अधिकार्‍यांचे एक पथक पाठवले असून त्यांनी प्रत्यक्ष कणकुंबीला  जाऊन कर्नाटकने नव्याने बांधकाम सुरू केल्याचे पुरावे आणले आहेत. कणकुंबीत कर्नाटक निरावरी निगमने गोव्याच्या बाजूने जाणारा प्रवाह रोखणारा बांध उभारला असून हेड रेग्युलेटरचे काम जोरात सुरू असल्याचे पथकाला आढळून आले आहे. सदर पुरावे कर्नाटक राज्यालाही पाठवले जाणार असून त्यांचे कारस्थान जलतंटा लवादापुढेही 15 जानेवारीला उघड केले जाणार आहे. आपण स्वत:ही या नव्या बांधकामाची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.