होमपेज › Goa › वीज दरवाढीचा निर्णय स्थगित ठेवा

वीज दरवाढीचा निर्णय स्थगित ठेवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

संयुक्‍त वीज नियमन आयोगाने राज्यात 1 एप्रिलपासून वीज दरवाढ  करण्याचा निर्णय स्थगित ठेवावा, अशी  आक्रमक भूमिका आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पणजीत पत्रकार परिषदेतून व्यक्‍त केली. वीज दरवाढीचा निर्णय  स्थगित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली जात आहे. अन्यथा  पणजीत  10 हजार लोकांना घेऊन मेणबत्ती मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री राणे म्हणाले की, संयुक्‍त वीज नियमन आयोगाने राज्यातील घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात 11 टक्के, कृषी वापरासाठीच्या वीज बिलात 9.38 टक्‍के  दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या खाण बंदी लागू असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले लोक संकटात सापडले आहेत. त्यांचे उत्पन्‍न बंद झाले आहे. त्यातच वीज दरवाढ लागू केल्यास लोक अधिकच त्रासात पडणार असून वीज दरवाढ परवडण्यासारखी नाही. वीज दरवाढीचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  गोव्यात परत येईपर्यंत  स्थगित ठेवावा. यासंबंधी त्रिमंत्री सल्‍लागार समितीकडे निवेदनाव्दारे  मागणी  केली जाणार आहे.

वीज दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून त्याचा तीव्र विरोध करायला हवा. प्रत्येक आमदार मग तो विरोधी अथवा सत्ताधारी  त्याने विरोध करण्याची गरज असल्याचे मत राणे यांनी  व्यक्‍त केले. भाजप सरकार हे जनतेबरोबर असून वीज दरवाढीबाबत आपण भाजप  नेत्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून वीज दरवाढीबाबत  संयुक्‍त वीज नियमन आयोगाने घेतलेला निर्णय केंद्राकडे मांडावा, अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

 

 

tags ; Panaji,news,joint electricity regulation commission electricity price hike decision deferred


  •