Sun, May 26, 2019 19:28होमपेज › Goa › ‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द

‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:53AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

पर्यटन विकास महामंडळाच्या पणजी ते रेईश मागूस दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी ‘रोप वे’प्रकल्प तसेच सीआरझेड क्षेत्रातील पंधरा प्रकल्पांना  तत्त्वत: दिलेली मान्यता गुंतवणूक प्रोत्साहन मंडळने (आयपीबी) शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत मागे घेतली. या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंडळाचे उपाध्यक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. गुंतवणूक प्रोत्साहन कायद्याच्या कलम आठनुसार मंडळ सीआरझेड क्षेत्रातील प्रकल्पांना मान्यता देऊ शकत नाही, असे स्पष्ट झाल्यामुळे पंधरा प्रकल्पांना  तत्त्वत: दिलेली मान्यता बैठकीत मागे घेतली.

मंडळाने  मान्यता  मागे घेतलेल्या प्रकल्पांमध्ये वेस्ट कोस्ट हॉटेल्सच्या लक्झरी हॉटेल्स व विला प्रकल्प, चाक्सू प्रॉपर्टीजचे मोरजी येथील पंचतारांकित हॉटेल, बाणावली येथे निर्मया रिट्रीट कंपनीच्या कॉटेजीस, वार्का येथील 40 खोल्यांचे लक्झरी हेल्थ सेंटर, मांद्रे येथे चार तारांकित हॉटेल , रेईश मागूस प्रॉपर्टी डेव्हलपर्सचे पंचतारांकित हॉटेल, आगोंदा येथे 75 खोल्यांचे हॉटेल आदी सीआरझेडमधील  प्रकल्पांचा समावेश आहे. काही पंचतारांकित हॉटेलांचे बांधकाम पूर्ण होत आले असले, तरी या नव्या निर्णयामुळे ते अडचणीत आले आहेत.

मंडळाने दोन खासगी क्षेत्रातील इस्पितळांसह एकूण सात प्रकल्प शुक्रवारी मंजूर केले. या सात प्रकल्पांमुळे एकूण 122 कोटी रुपयांची राज्यात गुंतवणूक होणार असून सुमारे 825 जणांना रोजगारसंधी निर्माण होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बोर्डा-मडगाव येथे ढवळीकर हॉस्पिटल्स (24 कोटींची गुतवणूक, 98 जणांना रोजगार);  खोर्ली- तिसवाडी येथे इमर्जन्सी मेडिकल सपोर्ट इस्पितळ  (16 कोटींची गुतवणूक, 315 जणांना रोजगार) यांचा  सहभाग आहे. ‘केपीएमजी’ या सल्लागार कंपनीचे पथक आयपीबीला मार्गदर्शन करत आहे.