होमपेज › Goa › बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला सोमवार (दि.5) पासून सुरुवात होत असून ही परीक्षा दि. 5 ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.  बारावीच्या  परीक्षा 16 मुख्य तसेच इतर उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून  सर्व विद्यार्थी इंग्रजी विषयाचा पेपर देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला असून यंदा 18 हजार 502  विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाच्या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार डिचोली, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे, म्हापसा , मडगाव, पणजी, हरमल, पेडणे, पिलार, फोंडा, फर्मागुडी, वास्को, नावेली, पर्वरी व साखळी अशा 16 केंद्रांत बारावीची परीक्षा सुरू होत आहे. यातील प्रत्येक केंद्रासाठी     

विविध उपकेंद्रे आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकाची आखणी देखील विद्यार्थ्यांना एका पेपरनंतर दुसर्‍या विषयाच्या तयारीसाठी वेळ मिळेल, अशी करण्यात आली आहे.  अभ्यासक्रमाची उजळणी व  गेला महिनाभर मुलांबरोबर रात्रभर जागून अभ्यास घेतलेल्या पालकांच्याही जीवाला  घोर लागला  आहे, असे एका पालकाने सांगितले. प्रत्येक पेपरसाठी अडीच तासांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रश्‍नपत्रिका सोडवायला सकाळी 10 वाजता  सुरुवात होणार असून अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात उपस्थित रहावे, असे शालांत मंडळाकडून कळविण्यात आले आहे. बारावी परीक्षेचा दुसरा पेपर दि. 7 मार्चला आहे. अकाउंन्टन्सी, भौतिकशास्त्र व इतिहास हे पेपर विद्यार्थी 7 मार्चला सोडवतील.