Thu, Jul 18, 2019 06:54होमपेज › Goa › विवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक

विवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:03AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

विवाहपूर्व समुपदेशन हे समाजासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शुक्रवारी गोवा राज्य रिसोर्स सेंटर फॉर ह्यूमनतर्फे तरुणांसाठी गोवा विद्यापीठात आयोजित विवाहपूर्व समुपदेशन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले. राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यपाल सिन्हा म्हणाल्या, केंद्र सरकारने राज्यांमध्ये विवाह नोंदणीत विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक करण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस केली आहे. आपल्या युवकांना त्यांच्या हक्कासंबंधी व त्याच्या जबाबदारीची माहिती देण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. निरोगी आणि आनंदी कुटुंब जीवन म्हणजे निरोगी समाजाची खूण आहे.

विवाहपूर्व समुपदेशन कार्यक्रम युवकांसाठी गोवा राज्य रिसोर्स केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार असून भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय महिला सशक्तीकरणांतर्गत देशात सर्वत्र कार्यक्रम घेण्यात येतील. गोवा विद्यापिठाच्या आवारात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात  येणार असून समुपदेशनाची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती  यावेळी उपस्थित समुपदेशकांनी दिली.

प्रा. साहनी यांनी विवाहपूर्व समुपदेशन ही आजच्या पिढीमध्ये मूलभूत गरज असून काळाची गरज असल्याचे सांगितले. विवाहपूर्व समुपदेशनाने आनंदी जीवन जगण्यास मदत होईल. यावेळी गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. वरूण सहानी, रजिस्ट्रार प्रा. वाय. व्ही. रेड्डी आणि सामाजिक विज्ञान विभागाचे डिन प्रा. एन.एस. भट, सेंटर फॉर ह्यूमन स्टडीजच्या प्रमुख डॉ. शैला डिसोझा उपस्थित होत्या. डॉ. शैला डिसोझा यांनी स्वागत केले. डॉ. ममता कुमारी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. काजल रिवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. एस. भट यांनी आभार मानले.