Tue, Aug 20, 2019 15:12होमपेज › Goa › ‘गोमेकॉ’त पहिल्याच दिवशी २.७० लाखांचा महसूल जमा

‘गोमेकॉ’त पहिल्याच दिवशी २.७० लाखांचा महसूल जमा

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 12:26AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील इस्पितळांमध्ये परराज्यातील रुग्णांकडून शुल्क आकारणीला  1 जानेवारीपासून   प्रारंभ करण्यात आला. गोमेकॉत पहिल्याच दिवशी परराज्यातील रुग्णांकडून सुमारे 2.70 लाख रुपयांचा महसूल जमा झाला, अशी माहिती गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.   गोव्यातील गोमेकॉसह चार सरकारी इस्पितळांमध्ये परराज्यातील रुग्णांकडून दि. 1 जानेवारीपासून शुल्क आकारणी सुरू करण्यात आली. यासंबंधी डॉ. बांदेकर म्हणाले, की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी गोमेकॉत परराज्यातील 24 टक्के रुग्ण तर शस्त्रक्रिया विभागात 19 टक्के रुग्ण भरती झाले. या रुग्णांकडून पहिल्याच दिवशी सुमारे 2.70 लाख रुपये शुल्काद्वारे प्राप्त झाले आहेत. नववर्षाची सोमवारी सुट्टी असूनही रुग्णांची संख्या त्या मानाने मोठी होती.

गोमेकॉसह अन्य चार सरकारी इस्पितळांत गरिबांना आणि आपत्कालीन  वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या परराज्यातील रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे. मात्र, गोमंतकीयांनी  ‘दयानंद स्वास्थ्य विमा योजनें’तर्गत कार्ड अथवा अन्य पुरावे सादर करणे बंधनकारक आहे, असे सूत्रांनी सांगितले. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळासह म्हापसा, मडगाव येथील जिल्हा इस्पितळांत व फोंडा येथील सरकारी इस्पितळात नववर्षापासून परराज्यातील रुग्णांना सशुल्क वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. गोव्याशेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कर्नाटकातील कारवार, कुमठा भागांतून वैद्यकीय उपचारांसाठी येणार्‍यांना आता गोव्यात आरोग्य सेवेला पैसे मोजावे लागतात, याची कल्पना आली असल्याने ते तयारीने येत असल्याचे सूत्रांनी  सांगितले.  

शुल्क नाममात्र गोवा सरकारच्या ‘दयानंद स्वास्थ्य विमा योजनें’तर्गत ‘क’ श्रेणी इस्पितळांत सुमारे 181 विविध वैद्यकीय उपचारांसाठी जेवढे शुल्क आकारले जाते, त्याच्या 20 टक्के इतके नाममात्र शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. गरीब आणि आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या परप्रांतीयांना मोफत सेवा दिली जाईल, मात्र याबाबतचा निर्णय आरोग्य खात्याचे संचालक व गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.