Wed, Jul 24, 2019 06:04होमपेज › Goa › ८० टक्के रोजगार गोमंतकीयांना  देणार्‍या उद्योगांना सवलती

८० टक्के रोजगार गोमंतकीयांना  देणार्‍या उद्योगांना सवलती

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:48PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

 जे उद्योग रोजगारात   60 ते 80 टक्के जागांवर स्थानिकांना   प्राधान्य  देतील त्याच उद्योगांना विशेष अनुदान योजनेचा लाभ  मिळेल,  असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  विधानसभेत    शुक्रवारी  प्रश्‍नोत्तर तासावेळी सांगितले.नव्या उद्योगांना परवानगी देताना  त्यात गोमंतकीयांना 80 टक्के रोजगारसंधी देण्याची सक्ती करण्यात आली आहे, का  या आमदार आंतोनिओ फर्नांडिस यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर  मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. 

 मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, उद्योग  व वाणिज्य खात्याच्या काही विशेष सवलत योजना आहेत ज्यांचा  60 ते 80 टक्के रोजगारसंधी गोमंतकीयांना   देणार्‍या उद्योगांना  लाभ मिळणार आहे. बहुंताश युवक  खासगी नोकरीला प्राधान्य देत नाहीत. यामागे  अल्प पगार व नोकरीची शाश्‍वती नसणे,अशी कारणे प्रमुख आहेत.  मच्छीमार ट्रॉलर्स तसेच  किनारी भागांमधील बहुतेक हॉटेल्समधील कामगारवर्ग हा परप्रांतीयच आहे. 

 गोव्यात रोजगार संधी असल्या तरी  संबंधित पदाला अनुसरून आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यासाठी कौशल्य विकास  प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण  दिले जाईल. गोव्यात  सुरक्षारक्षकांना देखील  मिळणारा पगार अल्पसा आहे.  सरकारने स्थापन केलेल्या मनुष्यबळ विकास महांमडळाकडून  सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दरमहा 15 ते 16 हजार रुपये इतका  पगार दिला जाईल. या महामंडळाने निवडलेल्या सुरक्षारक्षकांचीच नेमणूक   सरकारी खात्यांमध्ये  करण्याची सक्ती केली जाईल,असेही त्यांनी सांगितले.