Wed, Jul 24, 2019 06:19होमपेज › Goa › कर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही :  विनोद पालयेकर

"कर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही"

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:59AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना आपण कर्नाटकला पाणी कसे देऊ शकतो,अशी विचारणा करून कर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही,  असा इशारा  जलस्त्रोत मंत्री  विनोद पालयेकर यांनी  बुधवारी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे दिला आहे. म्हादई संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकशी  द्विपक्षीय चर्चेची तयारी  दर्शवल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी  हे ट्विट केले आहे.   म्हादईचे पाणी कर्नाटकला पिण्यासाठी देण्यासंदर्भात कर्नाटकच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चेची भूमिका मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतली आहे. याबाबत पर्रीकर यांनी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष  बी.एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठवल्यानंतर   राज्यात सर्व स्तरातून असंतोष  व्यक्त होत आहे.    पर्रीकर यांनी आपली चर्चेची भूमिका मागे घ्यावी, अशी मागणी  होत आहे.  

म्हादई  ही गोव्याची जीवनदायिनी आहे. गोव्याची भूमिका  स्पष्ट असून म्हादईविषयी  कुठल्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही.  मुळात तडजोडच शक्य नाही. गोवा पाण्यासाठी म्हादईवर अवलंबून असून हे पाणी दुसर्‍या राज्याला वळवल्यास गोव्याल्याच  पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागेल.   गोव्यातील जनतेला   पुरेसे पाणी मिळण्यास  अडचण होत आहे. या स्थितीत आपण  कर्नाटकाला  पाणी  कसे देऊ शकतो, अशी विचारणा करून मंत्रिपदच काय  पण आपली कसलाही त्याग करण्याची तयारी असल्याचे मंत्री पालयेकर यांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.  म्हादईच्या पाण्याच्या  प्रश्‍नात  राजकारण आणले जाणार नाही. आम्हाला गोव्याची जनता महत्त्वाची आहे. गोव्याच्या जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असेही पालयेकर यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवल्यास  गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी    जलस्त्रोत  खात्याचा त्याग करू, असा इशारा  यापूर्वीच दिला आहे.