Mon, Aug 19, 2019 07:23होमपेज › Goa › गोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू

गोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:00AM

बुकमार्क करा

पणजी ः पत्रक

गोवा मुक्ती दिनाचा 56 वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यासाठी गोवा सरकारतर्फे तयारी सुरू आहे. दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता कांपाल पणजीतील जलतरण तलावाजवळील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर गोवा मुक्ती दिन सोहळा होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावेळी राष्ट्रध्वज फडकवतील व पोलिस दलाच्या संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारतील. यानंतर त्यांचे भाषण होईल, अशी माहिती सरकारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उत्कृष्टता गाठलेल्या आणि योगदान दिलेल्या मान्यवरांना पुरस्कार  प्रदान केले जातील. कार्यक्रमास कॅबिनेटमंत्री, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, खासदार, आमदार, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, अ‍ॅड. जनरल आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यावर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, मुख्यसचिव धमेंद्र शर्मा आणि पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर स्वागत  करतील. 

सांस्कृतिक चित्ररथ, राष्ट्रीय एकात्मता गीते आणि शालेय विद्यार्थी मास पीटी ड्रील यावेळी सादर करतील. जिल्हा आणि तालुका पातळीवरही गोवा मुक्ती दिन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मडगाव येथील जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण करतील, सार्वजनिक बांधकाममंत्री रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर फोंडा येथील कार्यक्रमात ध्वजारोहण करतील.

म्हापसा येथेही गोवा मुक्तीदिन सोहळा होणार असून महसूलमंत्री रोहन खंवटे ध्वजारोहण करतील. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो वास्को येथे तिरंगा फडकवतील. पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर पेडणे येथे, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे वाळपई येथे, सभापती डॉ. प्रमोद सावंत डिचोली येथे, उपजिल्हाधिकारी काणकोण येथे, उपजिल्हाधिकारी केपे येथे, उपजिल्हाधिकारी धारबांदोडा येथे आणि मामलेदार सांगे येथे ध्वजारोहण करतील. 

या सोहळ्यानिमित्त दोनापावल येथील राजभवन, पणजी जुने सचिवालय आणि पर्वरीतील नवीन सचिवालय आणि लेखा संचालनालयाच्या इमारतींवर 18 डिसेंबर रात्री आणि 19 डिसेंबर रोजी विद्युत रोषणाई करण्यात येईल. गोव्याच्या राज्यपालांनी 19 डिसेंबर रोजी संध्या 5.15 वाजता राजभवनात स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.