Thu, Aug 22, 2019 14:36होमपेज › Goa › उत्तर कर्नाटकला 0.3 टीएमसी पाणी पुरेसे 

उत्तर कर्नाटकला 0.3 टीएमसी पाणी पुरेसे 

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
पणजी ः प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 15 टीएमसी पाण्याची मागणी अवाजवी आहे. कर्नाटकने जरी  उत्तर कर्नाटकातील हुबळी व अन्य भागांना  पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला तरी 0.3 टीएमसी पाणी त्यांना पुरेल, असे सांगून भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी यांनी म्हादई संदर्भात जलतंटा लवादासमोर गोव्याची बाजू भक्कम असून कसलीही तडजोड शक्य नसल्याचे बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पत्राद्वारे उत्तर कर्नाटकसाठी 7.5 टीएमसी  इतके म्हादईचे पाणी पिण्यासाठी देण्याची विनंती केल्याच्या पार्श्‍वभूमीवर  कर्नाटकातील नेत्यांवर भरोसा ठेऊ शकत नाही,असेही त्यांनी म्हटले. उत्तर कर्नाटकसाठी 0.3 टीएमसी पाणी पेयजल म्हणून पुरेसे असताना  येडियुरप्पा यांची 7.5 टीएमसी व  कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 15टीएमसी पाण्याची मागणी अवाजवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

कर्नाटकने मलप्रभा नदीत म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कणकुंबीत उभारलेल्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर म्हादईबाबतच्या खटल्यात  गोव्याची  बाजू भक्कम  असून   म्हादई बचावासाठी  लढा सुरू आहे.  त्यामुळे याविषयी कसलीही तडजोड शक्यच नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  कर्नाटकतील नेत्यांना पाठवलेले पाण्यासंदर्भातील पत्र  राजकीय  असून ते कायदेशीर नाही, असेही अ‍ॅड.नाडकर्णी यांनी म्हटले आहे.