Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Goa › ‘ग्रेटर पणजी पीडीए’च्या अध्यक्षपदी मोन्सेरात 

‘ग्रेटर पणजी पीडीए’च्या अध्यक्षपदी मोन्सेरात 

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:13AMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारने ‘गे्रटर पणजी पीडीए’ची स्थापना करण्यासाठी मान्यता दिली आहे. पीडीएवर सतरा सदस्य असून माजी मंत्री अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना मंगळवारी (दि. 13) निघणार असल्याचे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.   ‘गे्रटर पणजी पीडीए’वर सदस्य म्हणून पणजीचे व्यावसायिक विवेक आंगले, सीआयआय गोवा शाखेचे अध्यक्ष अत्रेय सावंत, माजी ज्येष्ठ नगरनियोजक पेद्रो कुतिन्हो, मारिओ फर्नांडिस, राज मळीक यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

याशिवाय पणजीचे आमदार तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा, सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस आणि कुंभारजुवेचे आमदार तथा वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांचाही समावेश असणार आहे. ताळगाव, चिंबेल, सांताक्रुज, जुने गोवा, कुडका-बांबोळी-तळावली पंचायतींचे सरपंचही सदस्य म्हणून असतील व नगर नियोजन खात्याचे विकास अधिकारी या पीडीएचे सदस्य सचिव असतील, असे सरदेसाई यांनी सांगितले. 

मोन्सेरात यांनी गेल्या वर्षीच्या शेवटी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी ‘गे्रटर पणजी पीडीए’ म्हणून स्वतंत्र विभाग तयार करून त्यावर मोन्सेरात यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. हा कयास खरा ठरला असल्याचे सोमवारच्या नव्या घडामोडीमुळे सिद्ध झाले आहे.  ‘गे्रटर पणजी पीडीए’ मध्ये ताळगाव, बांबोळी, कदंब पठार या भागाचा समावेश आहे. याशिवाय मोपा नियोजित ग्रीनफिल्ड विमानतळसभोवतालच्या भागात स्वतंत्र पीडीए स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील उर्वरित सर्व भाग उत्तर गोवा पीडीएमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.