Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Goa › एस. दुर्गा चित्रपटाचे भवितव्य आज ठरणार

एस. दुर्गा चित्रपटाचे भवितव्य आज ठरणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

48 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात (इफ्फी) वादग्रस्त चित्रपट ‘एस. दुर्गा’च्या खुल्या प्रदर्शनाबाबत सोमवारी भारतीय पॅनोरमा विभागाच्या परीक्षकांना तो दाखवून निर्णय घेतला जाणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन केवळ ज्युरी सदस्यांसाठी ठेवण्यात आले असून ‘इफ्फी’चे प्रतिनिधी अथवा पत्रकारांना मज्जाव असल्याचे ‘इफ्फी’च्या सूत्रांनी सांगितले.
‘इफ्फी’चे संचालक सुनित टंडन यांनी वादग्रस्त ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सनल शशीधरन यांना ई- मेलद्वारे या चित्रपटाची 35 एम.एम. प्रिंट आणि सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करण्यास शुक्रवारी सांगितले होते.

त्या सूचनेनुसार शशिधरन शनिवारी रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले असून, रविवारी पत्रकारांना भेटले असता ते म्हणाले की, आपणाला आणि आपल्या चित्रपटाला अशी हीन वागणूक का दिली जाते, हा आपल्याला प्रश्‍न पडला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 50 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतातर्फे प्रतिनिधीत्व केले असून 10 पुरस्कार प्राप्त केले आहेत. या चित्रपटात समाजातील कटू सत्य दाखवले गेले असल्याने त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला जात असावा. ‘इफ्फी’चे संचालक सुनित टंडन यांची आपण खूप प्रयत्नानंतर भेट घेतली असून ‘इफ्फी’च्या वेळापत्रकात ‘एस. दुर्गा’चा समावेश करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.  

शशिधरन ब्रिस्बेन-ऑस्टे्रलिया येथील ‘आशिया पॅसिफिक स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहून गोव्यात आले आहेत. शशिधरन यांनी ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र आणि पूर्ण 90 मिनिटे, 43 सेंकदांच्या चित्रपटाची कॉपी शनिवारी संध्याकाळी उशिरा ‘इफ्फी’ आयोजकांना सादर केली.