Sun, Aug 18, 2019 21:35होमपेज › Goa › पारंपरिक मच्छीमारांचे  प्रश्‍न सोडवण्यास प्रयत्नशील

पारंपरिक मच्छीमारांचे  प्रश्‍न सोडवण्यास प्रयत्नशील

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 11:17PM

बुकमार्क करा
पणजी ः प्रतिनिधी

राज्यातील पारंपरिक मच्छीमारांचे हक्क अबाधित असून त्यांच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही. मच्छीमारांच्या जास्तीतजास्त समस्या सोडविण्याच्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी मोरजी-पेडणे येथे मत्स्योद्योग खात्यातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात दिली. यावेळी पालयेकर यांनी पारंपरिक मच्छीमारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मंत्री पालयेकर म्हणाले, मोरजी येथे मच्छीमार धक्का नसल्याने पारंपरिक मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मच्छीमारांच्या मागणीनुसार, या भागात मच्छीमार शेड लवकरच उभारले जाणार असून मोरजी किनारपट्टी भागाची पाहणी करून मच्छीमारांचे प्रश्‍न त्वरित सोडविले जातील.

यावेळी मोरजी येथील स्थानिक मच्छीमारांनी चोपडे नदीच्या राष्ट्रीयीकरणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यावेळी मंत्री  पालयेकर यांनी मच्छीमारांना त्यांचे हक्क अबाधित राहणार असल्याचे सांगिूतले. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, मच्छीमार खात्याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप, उपसंचालक स्मिता मजुमदार, मोरजी निर्विकार मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भीम पेडणेकर, मोरजी सरपंच शांती पोके आणि इतर पंचायत सदस्य उपस्थित होते. दयानंद सोपटे यांनी अशाप्रकारचे सत्र मोरजीत आयोजित केल्याबद्दल पालयेकर यांचे आभार मानले. मत्स्योद्योग खात्याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप यांनी आभार मानले.